वाशी शहरात दहशतीचे वातावरण, शहर कडकडीत बंद
दोन गटात झालेल्या हाणामारीने व अवैध धंद्याने जनसामान्यांचा जीव टांगणीला
धाराशिव (सचिन कोरडे)
जिल्ह्यातील वाशी शहरात शिवजयंती मिरवणुकीमध्ये काही मुलांमध्ये डि.जे समोर नाचण्याच्या कारणावरून कुरबुर झाली होती. नंतर या भांडणाचे स्वरूप वाढत जाऊन (22 फेब्रु) रात्री सात ते आठच्या दरम्यान दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली.
यामुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहर पोलीसांची बघ्याची भुमिका मटक्याचे, गुटख्याचे, जुगाराचे, गावठी दारू चे तसेच अवैध धंद्याचे वाढलेले प्रमाण त्यामुळे शहरात गुंडगिरी वाढत आहे.
याच कारणामुळे शहरातील तणावपुर्ण वातावरणात काही दुर्घटना घडू नये म्हणून वाशी शहरातील व्यापारी वर्गाने 23 रोजी दुपारपर्यंत कडकडीत बंद पाळला होता.
एकीकडे दुष्काळी परिस्थिती ने शेतकरी तसेच व्यापारीवर्ग हवालदिल अन् त्यात भाजी मार्केट किराणा व इतर बाजारपेठा बंद यामुळे “घरचे झाले थोडे व्याह्याने धाडले घोडे” अशिच काहीशी अवस्था वाशीकरांची झालेली आहे.
अत्यंत शांतता प्रिय असणारे वाशी शहर हे गेल्या काही दिवसांपासून अवैध धंदे, राजकीय तेढ, तरुणातील वाढती गुन्हेगारी प्रवृत्ती यामुळे आज शहरातील जनसामान्य लोक दहशतीत वावरत आहेत.
वाशी शहरातील पोलीस प्रशासन अजून किती दिवस बघ्याची भूमिका बघणार? असा संतप्त सवाल नागरिकांमधून होत आहे.
या रोजच्या वाढत्या भांडणामुळे एखाद्याचा बळी गेल्यावरच पोलीसांना जाग येणार का?
अवैद्य धंद्यातून हप्ते वसुलीत गुंग असणाऱ्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना या सामान्यांची हाक ऐकू आली तर शहरातील दहशतीचे वातावरण निवळण्यास मदत होईल असेही ज्येष्ठ नागरिकांमधून बोलले जात आहे.