धाराशिव – धाराशिव नगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावण्यात आलेला नवीन लोखंडी गेट शहरातील नागरिक आणि वाहनधारकांसाठी मोठ्या त्रासाचे कारण बनला आहे. या गेटमुळे वाहतूक कोंडीत भर पडली असून, पालिकेत येणाऱ्या नागरिकांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांगांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
नगरपालिका प्रशासनाने आवारात होणारे दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे पार्किंग रोखण्यासाठी हा गेट बसवला आहे. मात्र, यामुळे नागरिक आणि कर्मचाऱ्यांना आपली वाहने मुख्य रस्त्यावरच उभी करावी लागत आहेत. परिणामी, धाराशिव-येडशी या वर्दळीच्या रस्त्यावर वाहतुकीची मोठी कोंडी होत असून अपघाताचा धोकाही वाढला आहे.

प्रशासनाने कोणताही सारासार विचार न करता किंवा नागरिकांना विश्वासात न घेता हा निर्णय घेतल्याचा आरोप नागरिक करत आहेत. “पालिकेचा हा निर्णय पूर्णपणे अकारण आणि नागरिकविरोधी आहे. यामुळे प्रशासनाची दंडेलशाहीवृत्ती दिसून येते,” असे मत अनेक संतप्त नागरिकांनी व्यक्त केले आहे.
या समस्येवर तातडीने तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासन यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.