कळंब – येरमाळा येथील पोलीस ठाण्याचे प्रभारी सापोनि विलास हजारे यांची महिन्या भरातच उचल बांगडी झाली आहे. गुटखा गाडीचे प्रकरण अंगलट आल्याने त्यांची बदली झाल्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहनलुटीच्या प्रकरणात जिल्हा पोलीस प्रशासनावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. गेल्या महिन्याभरापूर्वी गुटखा वाहतूक करणाऱ्या टेम्पो लुटीच्या प्रकारात पोलीसच वाहन लुटायला सांगतात असे आरोप करत वाहन लुटायला आलेल्या लोकांनी पोलीसांचा व्हिडिओ व्हायरल केला होता. जिल्हा पोलीस प्रशासनावर निर्माण झालेल्या प्रश्न चिन्हावर शिक्का मोर्तब झाले होते. या प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षक काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. त्या प्रकरणात हजारे यांची उचल बांगडी झाली असली तरी राष्ट्रीय महामार्गावरील लुटीत अधिकाऱ्यांचे हात असल्याचे बोलले असल्याने अधिकारी बदलुन महामार्गावरील वाहन लुटीचा प्रकार थांबणार आहे का? तसेच लुटीच्या प्रकरणाला आळा घालण्यात पोलीस प्रशासनाला यश येईल का? असा सवाल केला जात आहे.
येरमाळा परिसरातील पोलीस ठाणे हद्दीत नरसिंह साखर कारखाना ते येडशी टोलनाक्या पर्यंत चालत्या वाहनातून माल चोरीचे प्रकार दररोज घडत आहेत. या प्रकारात काही खाजगी वाहनधारकांची वाहने अडवून मोबाईल, सोने, रोख रक्कमेच्या जबरी चोऱ्यांचे प्रकारही घडले आहेत. गेल्या महिन्यात एक वाहन लुटत असताना त्यात गुटखा असल्याचे उघड झाले, पोलीसांच्या समक्ष हा प्रकार सूरु होता की पोलीसांनी उघड केला हा संशोधनाचा विषय ठरत आहे. सदरील प्रकारचे व्हिडिओ शूटिंग करुन सरळ-सरळ पोलीसांनी आम्हाला वाहन लुटायला सांगीतल्याचा प्रकार समोर आल्याने महामार्गावरील वाहन लुटीत आधीच संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या जिल्हा पोलीस प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे निघाले आहेत. राष्ट्रीय महामार्गावरील वाहने एवढ्या सहज लुटली जातात त्यामुळे यावरून पोलीस प्रशासनाचे या लुटिशी काही लागे बांधे आहेत की काय? अशी काही दिवसांपासून चर्चा होती.
गेल्या महिन्यात वाहन लुटीच्या प्रकारात व्हायरल व्हिडिओ वरुन नुकतेच महिनाभरापूर्वी जिल्हा बदली होऊन येरमाळा पोलीस ठाण्यात रुजू झालेले सपोनि विलास हजारे यांची उचल बांगडी करण्यात आली असुन नवीन सापोनि महेश क्षीरसागर यांची नेमणूक करण्यात आली आहे. अधिकारी बदलुन रस्त्यावरील वाहन लुटीच्या प्रकाराला आळा बसेल का? असा सवाल उपस्थित होत आहे.
वाहनलुटीचे प्लॅन अधिकाऱ्यांचे?
राष्ट्रीय महामार्गावरील वाहन लुटीचे प्रकार सतत घडत असल्याने पूर्वी येरमाळा ठाण्यात असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की,पूर्वीच्या बदलुन गेलेल्या एका उपविभागीय,पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी गुटखा वाहतूक करणारी वाहने आधी ताब्यात घेणे व्यवहार ठरवून सोडून देणे त्यानंतर चोरांना टीप देवून वाहन लुटून मालाची परस्पर विल्हेवाट (विक्री) करणे असे प्रकार दोनवेळा घडले आहेत. हे काही कर्मचाऱ्यांना माहिती होते. त्यांनी असा प्रकार अधिकाऱ्यांच्या परस्पर करण्याचा प्रयत्न केला होता. गेल्या महिन्यात गुटख्याची गाडी लुटण्याचा प्रकार म्हणजे कर्माचाऱ्यांनीच आखलेला डाव होता की काय? नंतर मात्र तो डाव फसला. शिवाय स्थानिक प्रभारी, सह, वरिष्ठ अधिकऱ्यांना अशा प्रकारचा वाटा दिला जातो असे पोलीस कर्मचाऱ्याने सांगितले