उमरगा – जेवण देण्याच्या व मदत करण्याच्या बहाण्याने तरुणीवर अत्याचार केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. उमरगा तालुक्यातील एका गावातील २५ वर्षीय तरुणीवर एका अज्ञात तरुणाने फसवून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी उमरगा पोलिस ठाण्यात संबंधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. ८ मे २०२५ रोजी दुपारी ३ वाजल्याच्या सुमारास पीडित तरुणी गावात जाण्यासाठी बसस्थानकावर थांबली होती. त्यावेळी एका तरुणाने तिला “जेवण देतो व मदत करतो” असे सांगून विश्वासात घेतले. त्यानंतर तिला आपल्या खोलीवर नेऊन दि. १० मे २०२५ रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला.
या प्रकरणी पीडितेने दि. १२ मे २०२५ रोजी उमरगा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून भादंवि कलम ३७६ (संशयित कलम ६४), तसेच अनुसूचित जाती आणि जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ अंतर्गत कलम ३(१)(डब्ल्यू) (iii), ३(२)(व्ही) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.