जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस पत्रकारांना बंदी; नेत्यांच्या बगलबच्यांना मात्र संधी
धाराशिव – धाराशिव जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. त्यामुळे बैठकीत काय शिजले,काय भिजले हे जनतेसमोर येण्यास आडकाठी बसणार आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या मागच्या बैठकीवेळी एका पुढाऱ्याने अधिकाऱ्याच्या कानात ‘गुफ्तगू’ केली आणि अधिकाऱ्याने पत्रकारांना बाहेर जाण्याचा आदेश केला.पत्रकारांना बैठकीस बंदी घालण्यात आल्याने पत्रकारांनी काळ्या फिती लावून नियोजन समितीच्या सभागृहाबाहेर निषेध व्यक्त केला होता. पत्रकारांना बैठकीतून बाहेर जाण्यास सांगितल्याने नेते मंडळींचे बैठकीत काय शिजते?काय भिजते? हे जनतेसमोर कसे येणार असा प्रश्न निर्माण होत आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत नेत्यांचा बगलबच्यांना, चमकूगिरी करणाऱ्यांना बसण्याची संधी दिली जाते. आणि त्यासोबतच बगलबच्यांच्या चहा-पाण्याची सोय देखील केली जाते.
2005 साली विलासराव देशमुख यांच्या काळात पत्रकारांना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थित राहण्यास परवानगी होती,त्यामुळे बैठकीत झालेली चर्चा, निर्णय ह्या गोष्टी जनतेसमोर तत्काळ येण्यास फायदेशीर ठरत होते.मात्र आता स्वतःला जिल्ह्याचे मालक समजू लागलेल्या पुढाऱ्यांच्या मनमर्जिने पत्रकारांना बैठकीस बंदी घालण्यात आल्याने पत्रकारांमधून ह्या बाबीचा निषेध व्यक्त होत आहे.