धाराशिव – उस्मानाबाद-धाराशिव लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सायबर विभागाकडून त्यांना क्लीन चीट देण्यात आली आहे. अर्चना पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना पैसे देऊन गर्दी जमावल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी केला होता. त्यांनी आपल्या तक्रारीसोबत चार व्हिडीओ सादर केले होते त्यानंतर या प्रकरणात सायबर विभागानं तपास सुरू केला होता. खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी तक्रारीसोबत दाखल केलेले ते व्हिडीओ खोटे अर्थात इडिटेड असल्याचं सायबर विभागाच्या तपासात समोर आलं आहे. त्यानंतर सायबर पोलीस विभागानं आपला लेखी अहवाल निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्याकडे सादर केला आहे.
तांत्रिक तपासणीत हे व्हिडीओ खोटे असल्याचं समोर आलं आहे. व्हिडीओमधील भाषा स्क्रिपटेड व बॅकग्राउंड ब्लर असल्याने लोकेशन सांगणे कठीण असल्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यानंतर संबंधित लोकांचे जबाब नोंदविण्याची शिफारस करण्यात आली आहे. या प्रकरणात दोन्ही उमेदवारांकडून परस्परांविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.