धाराशिव – येरमाळा येथील प्रसिद्ध असलेली आराध्य दैवत आई येडेश्वरी देवीच्या चैत्र यात्रेनिमित सोमवारी प्रशासकीय नियोजन बैठक पार पडली.
आई येडेश्वरी देवीची चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने भरणारी यात्रा ही 12 ते 17 एप्रिल दरम्यान भरणार आहे. यात्रेच्या अनुषंगाने प्रशासकीय बैठक ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली. उपविभागीय अधिकारी संजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीस तहसीलदार हेमंत ढोकले, गटविकास अधिकारी आर.व्ही.चकोर, वैद्यकीय अधिकारी एस.टी बिरादार, बांधकाम उप अभियंता सतीश वायकर, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेलोरे, सरपंच प्रिया बारकुल , उपसरपंच गणेश बारकुल, माजी सरपंच विकास बारकुल, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार, सपोनी तात्या भालेराव, तलाठी एस.व्ही गायकवाड , मंडळ अधिकारी नागटिळक, महावितरणचे अधिकारी अभियंता आणि नीलांबरी कुलकर्णी, उपविभागीय अभियंता जे.एच.लांडे शाखा अभियंता स्नेहा गोगलवार, राज्य परिवहन महामंडळाचे जिल्हा वाहतूक नियंत्रक संतोष कोष्टी देवस्थानचे समाधान बेद्रे, अमोल पाटील राहुल पाटील, माजी जि.प.सदस्य मदन बारकुल, संतोष आगलावे व ग्रामस्थ तसेच पुजारी उपस्थित होते.

यावेळी यात्रा काळात केल्या जाणाऱ्या उपाययोजनाबाबत आरोग्य विभाग, पाणीपुरवठा जि.प.बांधकाम विभागाने तयारीची माहिती दिली ग्रामपंचायतने शुद्ध आणि मुबलक पाणीपुरवठा याबाबत विशेष तयारी केली असल्याचे सांगितले. तर मंदिर ट्रस्टने मंदिर व आमराई परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे व पिण्याच्या पाण्याची मुबलक सोय, पोलीस बंदोबस्ताच्या मदतीला खाजगी कंपनीचे सुरक्षा रक्षक तुकडी नेमल्याचे सांगितले.
दरम्यान या बैठकीस आय.आर.बी मेगा प्रकल्प संचालक, प्रादेशिक वन विभाग, तालुका आरोग्य अधिकारी यांनी बैठकीकडे पाठ फिरवल्याचे निदर्शनास आले. यामुळे नियोजन बैठकीचे गांभीर्य संबंधित अधिकाऱ्यांना नसल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.