धाराशिव – जिल्ह्यात अवकाळीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र आहे. ह्या पाहणीसाठी राजकीय पुढारी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊ लागले आहेत. तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून देखील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली. मात्र, या पाहणीवेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा असंवेदनशीलपणा दिसून आला.
मे महिन्यामध्येच जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पावसाने हाहाकार माजवला आहे. मागील पंधरा दिवसांपासून सलग सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. फळबागा, जनावरे, घरे आणि इतर मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वीज पडून दोघांना तर ३६ पशुधनांना आपला जीव गमवावा लागला आहे.

याच पार्श्वभूमीवर तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी तुळजापूर व धाराशिव तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. मात्र, पाहणी करत असताना एक अजब प्रकार पाहायला मिळाला. शेतकरी समोर कैफियत मांडत असताना आमदार साहेबांच्या चेहऱ्यावर मात्र “हसू” आल्याचे स्पष्टपणे कॅमेऱ्यात कैद झाले.
पाहणी करून तातडीने पंचनामे पूर्ण करून मदतीसाठी स्वयंस्पष्ट अहवाल शासनाकडे सादर करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला जरी दिले असले तरी पाहणी करत असताना पावसाने नुकसान झालेले कांदा पीक हातात घेत त्यांनी त्यावर “हसून फुंकर” मारत शेतकऱ्यांची थट्टा तर केली नाही ना? असा सवाल शेतकऱ्यांनी विचारला तर नवल वाटायला नको.