वाशी पोलीसांकडून तिघांना अटक पाच जणांचा शोध सुरू
वाशी – वाशी तालुक्यातील गोलेगाव येथील बेपत्ता महिलेचा मृतदेह दि.15 डिसेंबर रोजी शेतातील घरा मध्ये रिकाम्या पाण्याच्या बॅरल मध्ये आढळून आल्यामुळे वाशी तालुक्यात खळबळ उडाली असून सदर महिलेचा तिच्याच नातेवाईकांनी संपत्तीच्या व सोन्याच्या वादातून खून केल्याची फिर्याद महिलेच्या मुलाने वाशी पोलिसात दिल्यामुळे आठ जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून आरोपींपैकी तीन जणांना अटक केली असून पाच जणांचा शोध सुरू आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाशी तालुक्यातील गोलेगाव येथील रेखा गौतम गायकवाड (वय 55 वर्ष) व त्यांची सासू सुदामती घनश्याम गायकवाड या दोन्ही बेपत्ता असल्याची तक्रार दि.१३ डिसेंबर रोजी वाशी पोलिसात नातेवाईकांनी दाखल केली होती. यानंतर दि. १४ डिसेंबर रोजी वाशी पोलीसांचे पथक जमादार बाबासाहेब जाधवर, म.पो.नाईक निर्मला चाटे, कॉ.श्रीनिवास घुले यांनी दौंड जि.पुणे येथे तपास कामी जाऊन सुदामती गायकवाड यांचा शोध घेऊन त्यांना नातेवाईकांच्या ताब्यात दिले.मात्र रेखा गौतम गायकवाड यांचा शोध लागलेला नव्हता. त्यामुळे पोलिसांनी बेपत्ता महिलेची सासू सुदामती यांच्याकडे विचारणा केली असता रेखा शेतात गेल्या होत्या मात्र घरी परतल्या नव्हत्या असे सांगितले.त्यानुसार वाशी पोलिसांच्या पथकाने गोलेगाव शिवारातील शेत गाठले .यावेळी घरामध्ये एक खड्डा खोदून तो नंतर बुजवण्यात आल्याचे खिडकीतून दिसले. त्यामुळे पोलीस निरीक्षक संग्राम थोरात, वाशी तहसीलच्या नायब तहसीलदार पूजा पाटील, अव्वल कारकून कदम व पोलीस कर्मचारी बळीराम यादव, दादाराव औसारे, नसीर सय्यद आदी कर्मचाऱ्यांनी बंद खोलीचा दरवाजा 15 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पंचासमक्ष उघडून खोदकाम सुरू केले मात्र, जवळपास तीन ते चार फूट खोदून काहीच सापडले नाही. आरोपींकडून घरामध्ये उग्र वास येण्यासाठी घरात थायमीट टाकण्यात आले होते. दरम्यान याचवेळी घरामध्ये एक रिकामें प्लास्टिकचे बॅरल पोलिसांना दिसून आले पोलिसांनी त्याची पाहणी केली असता बॅरल कपड्यांनी झाकून ठेवण्यात आले होते .सदरील कपडे बाजूला काढले असता बॅरलमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला.
व्हीसेरासाठी मृतदेह धाराशिव ला
बॅरलमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून प्रेत तेरखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले व मयताचा व्हिसेरा राखून ठेवण्याची मागणी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे केली. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्हीसेरा राखून ठेवण्याची सोय येथे नसल्याचे सांगितले. त्यामुळे सदरील महिलेचा मृतदेह 16 डिसेंबर रोजी दुपारी चार च्या सुमारास धाराशिव जिल्हा रुग्णालयात पाठवून शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी मयत रेखा गायकवाड यांचा मुलगा शुभम गायकवाड यांनी वाशी पोलिसात येऊन फिर्याद दिली की आरोपी अंजली विकास भोसले, निकिता विकास भोसले, सचिन सुभाष शिरसाट, दीक्षा सचिन शिरसाट, सरस्वती सुभाष शिरसाट, सर्व रा. अजिंठा नगर पुणे, बालाजी मगर रा.वाघोली ता.जी.धाराशिव, दीपक वाघमारे, वैशाली दीपक वाघमारे रा.पुणे यांनी फिर्यादीच्या आईसोबत प्रॉपर्टी व सोन्याचे विषयी घटनेच्या काही दिवसांपूर्वी वाद घालून दि. ८ डिसेंबर रोजी फिर्यादीची आई रेखा गायकवाड हीस आरोपी क्रं.1व 2 यांनी तुझे सोने तुला परत देतो असे म्हणून फिर्यादीचे शेताकडे घेऊन गेले. व फिर्यादीचे आईस जीवे ठार मारून तिचे प्रेत शेतातील घरामध्ये प्लास्टिकच्या बॅरल मध्ये टाकून पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने लपउन ठेवले अशी फिर्याद वाशी पोलीसात दिल्यामुळे आठ जणां विरोधात खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून वाशी पोलीस निरीक्षक संग्राम थोरात, पो.जमादार बाबासाहेब जाधवर, पो. जमादार बळीराम यादव, पो.नाईक दादाराव औसारे,पो. नाईक नसीर सय्यद,म. पो.नाईक निर्मला चाटे ,कॉ.विठ्ठल मलंगनेर, कॉ.श्रीनिवास घुले यांनी तपासाचे चक्रे फिरवून संशयित आरोपी बालाजी मगर रा.वाघोली ता.जि.धाराशिव व अंजली विकास भोसले व तिची मुलगी निकिता विकास भोसले हल्ली रा.निगडी पुणे यांना संशयित म्हणून पुन्हा दाखल होण्याअगोदरच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संग्राम थोरात हे करत आहेत.