तुळजापूर – शेतात आई वांगी काढत असताना पाण्याच्या हौदाजवळ खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या चिमुकल्याचा हौदात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी संध्याकाळी तुळजापूर तालुक्यातील हंगरगा (तुळ) या गावात घडली. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
समर्थ बालाजी चव्हाण (वय अडीच वर्ष) असं या निष्पाप बालकाचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, समर्थ आपल्या आईसोबत शेतात गेला होता. आई शेतात वांगी काढत असताना समर्थ जवळच असलेल्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याच्या हौदाजवळ खेळत होता. खेळता-खेळता तो अचानक हौदात पडला. आईने कामातून डोकं वर केलं असता तो दिसेनासा झाला होता. शोधाशोध केली असता तो पाण्यात बुडाल्याचं आढळून आलं.
तातडीने त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केलं. चिमुकल्या जीवाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गाव शोककळा पसरली आहे.