धाराशिव – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला धाराशिव जिल्ह्यातून अजून एक धक्का बसला आहे. ऐन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ आलेल्या असतानाच भूम-परंडा मतदार संघातून शरद पवारांचा एक शिलेदार “दादा” गटात सामील होणार आहे.
भूम परंडा मतदार संघाचे माजी आमदार राहुल मोटे हे अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची बातमी दिनांक 3 ऑगस्ट रोजी MH 25 News ने प्रसारित केलं होती. या बातमीवर आता शिक्का मुहूर्त झाले असून उद्या दुपारी तीन वाजता माजी आमदार राहुल मोटे यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त MH 25 News च्या हाती लागले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून माजी आमदार राहुल मोठे हे अजित पवारांच्या संपर्कात असल्याची चर्चा धाराशिव जिल्ह्यामध्ये दबक्या आवाजात सुरू होती. मात्र दोन दिवसांपूर्वी बैठकांचा जोर वाढू लागल्याने राहुल मोटे हे लवकरच अजित पवार गटात डेरेदाखल होतील अशी चर्चा जोर धरू लागली होती. या वृत्ताला राहुल मोटे यांच्या निकटवर्तीयांनी दुजोरा दिला असून उद्या मोटेंचा पक्ष प्रवेश होणार आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत राहुल मोटे यांनी भूम-परांडा मतदार संघातून महाविकास आघाडी मधून राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटाकडून निवडणूक लढवली होती. मोटे यांनी महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार तानाजी सावंत यांना जबरदस्त टक्कर दिली होती. आता हेच राहुल मोठे महायुतीमध्ये सामील झाल्याने या मतदारसंघातील राजकीय समीकरणे कशी जुळतात? हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.











