वाशी – मराठा आरक्षणावर मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे.आज उपोषणाचा पाचवा दिवस असून मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. मनोज जरांगे यांनी कोणतेही उपचार घेण्यास साफ नकार दिला आहे.याच पार्श्वभूमीवर आज दि.14 रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने ‘महाराष्ट्र बंद’ ची हाक देण्यात आली आहे.
धाराशिव जिल्ह्यात भूम-परंडा-वाशी सह धाराशिव शहरामध्ये बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.व्यापारी व दुकानदारांनी देखील दुकाने बंद ठेवत या बंदमध्ये सहभाग नोंदवला आहे.धाराशिव जिल्ह्यात ग्रामीण भागात देखील बंदची हाक दिल्याने ग्रामीण भागात देखील हा बंद कडकडीत पाळण्यात आला आहे.वाशी तालुक्यातील तेरखेडा येथे गावातील सर्व व्यवहार बंद ठेवत ग्रामस्थ व व्यापाऱ्यांनी बंद मध्ये सामील होत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवली आहेत.त्यामुळे महाराष्ट्र बंद ला शहरी तसेच ग्रामीण भागांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.