मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत. एवढंच नाही तर ते अंतरवाली सराटीहून देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याकडे निघाले आहेत. रात्री भांबेरी गावामध्ये जरांगे थांबले होते. आता मनोज जरांगे पाटील आज भांबेरी गावातून मुंबईकडे रवाना होणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाणार असल्याची त्यांनी रात्री उशिरा घोषणा केली.
भांबेरी गावात रात्रभर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. दंगा नियंत्रक पथक जालना पोलीस आणि राज्य सुरक्षा बलसुद्धा बोलावण्यात आलं आहे. भांबेरी गावात येणाऱ्या तिन्ही मार्गावर पोलीसांच्या गाड्या उभ्या आहेत. जालना जिल्ह्यातील वाहतूक पोलीसांचे सर्व बॅरिकेटर्स ठिकठिकाणी ठेवण्यात आले आहेत. दुपारी 12 वाजता जरांगे पाटील मुंबईला जाण्याची शक्यता आहे. मात्र पोलीसांचा बंदोबस्त पाहता ते गावातून बाहेर पडू शकतील का? हा सवाल आहे.
नुकतंच समोर आलेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे पाटील यांच्या जवळील 6 ते 7 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. जालना पोलीसांनी पहाटे 3 वाजता ही कारवाई केली आहे. पोलीसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करत जरांगे पाटील यांच्या कोर टीममधील समर्थकांना ताब्यात घेतले असल्याचं समोर येत आहे.
काय केले मनोज जरांगे यांनी आरोप?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांनी षडयंत्र रचल्याचा गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले, ‘तुझा बाम्हणी कावा मी आता हाणून पाडतो आणि सगे सोयरेची अमंलबजावणी घेतल्याशिवाय राहत नाही. मला सलाईनद्वारे विष देवून मारण्याचा यांचा डाव आहे. त्यामुळं इथे उपोषण करत मरण्यापेक्षा मीच तिथे येतो, घाला मला गोळ्या’. अशी आक्रमक भूमिका घेत मनोज जरांगे फडणवीस यांच्या सागर बंगल्याकडे निघाले आहेत. सध्या भांबेरी या गावात पोहोचले असून तिथून हजारो मराठा आंदोलकांसह दुपारी 12 वाजता निघणार आहेत. दरम्यान जरांगे यांनी मुंबईच्या दिशेने येऊ नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.