धाराशिव – राज्यभर गाजत असलेल्या तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीलाच भाजपाने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर केल्याने धाराशिव च्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. तुळजापूरचे ड्रग्स प्रकरण हे राज्यभर गाजत आहे. यातील आरोपी विनोद गंगणे याने भाजपमध्ये काही दिवसांपूर्वीच पक्ष प्रवेश केला होता. त्यानंतर आता त्याला थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गंगणे यास उमेदवारी जाहीर होताच विरोधक आणखीन आक्रमक होण्याची शक्यता आहे.
विनोद उर्फ पिटू गंगणे सध्या ड्रग्स प्रकरणात जेलमधून जामिनावर बाहेर आहेत. त्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीस उमेदवारी देणं योग्य आहे का? असा संतप्त सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे. विरोधी पक्षांनी यापूर्वीही या प्रकरणावरून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. आता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विरोधक आणखीच आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. भाजपच्या या निर्णयाने आता तुळजापूर नगरपालिका निवडणुकीत मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. काही दिवसांपूर्वीच ड्रग्ज प्रकरणातील जामीनावर बाहेर असणारा आरोपी माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वरला भाजपमध्ये प्रवेश दिल्याने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर झाली टीका होती. यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देखील लिहिले होते.
पक्षश्रेष्ठींच्या आदेशालाच धुडकावलं?
भाजप पक्षश्रेष्ठींकडून महंत इच्छागिरी गगनगिरी महाराज यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. मात्र, या आदेशाकडे दुर्लक्ष करून आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि जिल्ह्यातील काही स्थानिक नेत्यांनी पिटू गंगणे यांनाच उमेदवारी दिल्याचं समजतं. यामुळे तुळजापूरसह जिल्ह्यात मोठी चर्चा रंगू लागली आहे.











