वाशी – धाराशिव जिल्ह्यात पुन्हा एकदा बिबट्याचा वावर निदर्शनास आला असून वाशी तालुक्यातील कडकनाथ वाडी शिवारात 3 जनावरांचा बळी घेतल्याचे समोर आले आहे.
कडकनाथवाडी येथील शेतकरी संदीप शिंदे, गुरुनाथ शिंदे यांची जनावरे कडकनाथवाडी गावापासून तीन किलोमीटर आंतरावरील हरणखुरी या ठिकाणी चरत असताना बिबट्याने हल्ला केला. काही पाऊलांच्या अंतरावर सोलापूर जिल्ह्यातील धामणगाव फॉरेस्ट आहे. पाऊस झाल्यामुळे डोंगर जमीन हिरव्यागार झाले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची जनावरे चारा खाण्यासाठी डोंगरात जातात. गुरे चरण्याचे ठिकाण कडकनाथवाडी गावापासून दूर असल्याने शेतकरी आपली जनावरे त्याच ठिकाणी बांधून ठेवली असता रात्री बिबट्या किंवा वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. जनावरे हल्ल्यामुळे मृत पावल्याचे दृश्य शेतकऱ्यांना सकाळी दिसून आले. ह्या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बिबट्या किंवा वाघ सदृश्य प्राणी असल्याने प्रशासनाने या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन सदरील प्राण्याला जेरबंद करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.