दहा हजार रोजगार निर्मितीच्या दिशेने मोठे पाऊल : आमदार राणाजगजितसिंह पाटील
धाराशिव – कौडगाव येथे एमआयडीसीच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या टेक्निकल टेक्सटाईल पार्कच्या पायाभूत सुविधांसाठी 114 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात रस्ते विकसित करण्यासाठी 24.54 कोटी रूपयांच्या कामांना मंगळवारी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. दहा हजार रोजगार निर्मितीच्या दिशेने हे मोठे पाऊल आहे. आपल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून महायुती सरकारने दिलेला शब्द पाळला असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
धाराशिव येथील कार्यक्रमात २०१९ साली महाजनादेश यात्रेदरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौडगाव एमआयडीसीमध्ये राज्यातील पहिला टेक्निकल टेक्सटाईल पार्क सुरू करण्याची जाहीर घोषणा केली होती. त्यानुसार त्यावेळी उद्योग विभागाने ‘केपीएमजी’ या जगप्रसिध्द सल्लागार संस्थेच्या माध्यमातून अहवाल तयार करण्यात आला. तो एमआयडीसीकडे सादरही केला गेला. मात्र त्यानंतर ठाकरे सरकारच्या कार्यकाळात पुढे काहीच प्रगती झाली नाही. या महत्वपूर्ण प्रकल्पासाठी ठाकरे सरकारने साधी बैठक देखील लावली नाही. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आपले महायुतीचे सरकार आले. उद्योग मंत्र्यांच्या स्तरावर बैठक घेण्यात आली. प्रक्रियेला वेग आला. मागील वर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशनात धाराशिव जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कायापालट करण्याची क्षमता असलेल्या या बहुप्रतिक्षित आणि महत्वाकांक्षी टेक्निकल टेक्सटाईल पार्कचे काय झाले? असा लक्षवेधी प्रश्न आपण उपस्थित केला होता. त्यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी हा प्रकल्प एमआयडीसीच्या माध्यमातूनच केला जाणार असल्याची घोषणा विधानसभेत केली होती. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे महायुती सरकारने शब्द पाळला असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले.

कौडगाव औद्योगिक वसाहतीमध्ये 90 हेक्टर क्षेत्रावर तांत्रिक वस्त्रोद्योग प्रकल्प म्हणजेच टेक्निकल टेक्सटाईल पार्क नियोजित आहे. त्यातून 10 हजार रोजगार निर्माण होणार आहे. टप्पा क्र. 3 च्या या प्रकल्पासाठी रस्ते, पुल, पाणीपुरवठा, पाईपलाईन, विद्युतीकरण, वृक्षारोपण आदी पायाभूत सुविधांकरिता 114 कोटी रूपयांच्या आराखडा एमआयडीसीने तयार केला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 24.54 कोटी रूपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.यात रस्ते विकसित करण्याच्या कामासाठी 16.54 कोटी व इतर अनुषंगिक खर्च व विविध करांपोटी 8 कोटी रुपयांना मान्यता देण्यात आली आहे.दळणवळणासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी झाल्यानंतर पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. या सुविधा पूर्ण झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात उद्योजक या ठिकाणी आकर्षित होतील. त्यामुळे तांत्रिक वस्त्र निर्मितीला मोठा वाव मिळणार आहे. या क्षेत्रात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर झपाट्याने मोठी वाढ होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीसाठी उद्योजकही उत्सुक आहेत. 10 हजार रोजगार निर्मितीच्या दिशेने हे सर्वात मोठे पाऊल असल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.