कळंब – डोक्यावर झालेले कर्ज फेडण्यासाठी वडील जमीन विक्री करण्यासाठी सहमती देत नसल्याने झोपेतच दगड घालून मुलाने वडिलांचा खून केल्याची घटना घडली असून, याप्रकरणी मुलाला अटक करण्यात आली असून जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
कळंब तालुक्यातील पानगाव येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. झालेले कर्जपाणी फेडण्यासाठी वारंवार सांगूनही वडील शेत विकण्यास सहमती देत नसल्याने मुलानेच वडिलांच्या डोक्यात दगड घातला. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली.
पानगाव येथील देविदास भाऊराव वाघमारे (वय ६८) हे सध्या सुगीचे दिवस असल्याने शनिवारी झोपण्यासाठी शेतात गेले होते. ते सकाळी शेतात मृत अवस्थेत आढळून आले. घटनेची माहिती येरमाळा पोलिसांना समजताच सपोनि महेश क्षीरसागर यांनी घटनास्थळाला भेट दिली. तेव्हा मुलगा बालाजी वाघमारे याने शेतीच्या वादातून वडिलांना मारल्याची माहिती देवून चार संशयितांची नावे सांगितली. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक हसन यांनी घटनास्थळी भेट देवुन येरमाळा पोलिसांना तपासासाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशानुसार मार्गदर्शन केले असता मुलगा बालाजी वाघमारे याने वडील आपल्याला झालेले कर्ज पाणी फेडण्यासाठी वारंवार सांगूनही शेत विकण्यास सहमती देत नसल्याने वडिलांना झोपेतच डोक्यात दगड घालून ठार केल्याची कबुली दिली.देवीदास यांच्या पत्नी वृंदावणी देविदास वाघमारे (वय ६५) यांच्या फिर्यादीवरुन मुलगा बालाजी देविदास वाघमारे (वय २८) याच्यावर येरमाळा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करुन त्याला अटक करण्यात आली आहे.