आयसीसी 19 वर्षांखालील (Under 19) वनडे विश्वचषक स्पर्धा सध्या सुरू आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात स्पर्धेतील 25 वा सामना मंगळवारी (30 जानेवारी) खेळला गेला. एकतर्फी झालेल्या या सामन्यात भारताने तब्बल 214 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 295 धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघ अवघ्या 81 धावांवर सर्व बाद झाला. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागांमध्ये भारताने चमकदार कामगिरी केली आणि विश्वचषकातील आपला सलग चौथा विजय मिळवला
न्यूझीलंडला या सामन्यात विजयासाठी 296 धावांचे लक्ष्य मिळाले होते. प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघ मात्र 28.1 षटकात अवघ्या 81 धावा करून सर्वबाद झाला. संघातील एकही फलंदाज 20 धावांपेक्षा मोठी खेळी करू शकला नाही. तीन फलंदाजांनी शुन्यावर, तर तीन फलंदाजांनी एक आकडी धावसंख्येवर विकेट्स गमावल्या. भारतासाठी सौम्य पांडे (Saumya Pandey) पुन्हा एकदा चेंडूने मॅच विनर ठरला. त्याने आपल्या फिरकीच्या जाळ्यात मंगळवारी न्यूझीलंडचे एकू चार फलंदाज अडकवले. यासाठी त्याने 10 षटके गोलंदाजी केली आणि 19 धावाही खर्च केल्या. तत्पूर्वी फलंदाजी विभागातून भारतासाठी सर्वोत्तम प्रदर्शन मुशीर खान (Musheer Khan) याने केले. 19 वर्षांखालील विश्वचषकात भारतीय संघाने मिलवलेला हा सलग चौथा विजय ठरला.