जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रेशीम शेतीची लागवड करून कायम स्वरूपाचे उत्पन्न घ्यावे – जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे
धाराशिव – रेशीम शेती हा खात्रीशीर उत्पन्न देणारा उद्योग आहे.शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून रेशीम उद्योग करणे आज काळाची गरज आहे.या शेतीपासून शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होत आहे.कायमस्वरूपी आर्थिक उत्पन्न देणारे व शेतकऱ्यांची भरभराट हे पीक आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रेशीम शेतीची लागवड करून मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेऊन आपली आर्थिक प्रगती करावी.असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी केले.
आज 12 जुलै रोजी राज्यातील पहिल्या सर्व अत्याधुनिक सुविधायुक्त रेशीम चॉकी सेंटर वाशी तालुक्यातील खामकरवाडी येथील रेशीम उद्योजक शेतकरी अतुल लुगडे यांनी सुरू केले. उद्घाटन प्रसंगी डॉ.ओंबासे बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रूपल धरमकर,जिल्हा रेशीम अधिकारी आरती वाकुरे,वाशीचे तहसिलदार राजेश लांडगे,आयसीआयसीआय फाउंडेशनचे झोनल हेड दीपक पाटील,प्रकल्प व्यवस्थापक चेतन पाटोळे,व्हाईट गोल्ड चॉकी सेंटरचे अध्यक्ष अतुल लुगडे,रेशीम शेती तज्ज्ञ व उद्योजक शेतकरी बालाजी पवार, गणेश आदटराव व सुनील मसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ ओंबासे पुढे म्हणाले की,कोणताही उद्योग करण्यासाठी धाडस करावे लागते.उद्योग उभा करण्यासाठी पैशाची आवश्यकता असते. त्यासाठी बँकेचे कर्ज घेणे आवश्यक असते.विशेष म्हणजे उद्योग उभा करण्यासाठी कर्ज घेतले की भिक लागते असा समज मोठ्या प्रमाणात रुजला आहे.मात्र उद्योजक असलेले अदानी व अंबानी यांनी स्वतःच्या खिशातील पैसे उद्योगासाठी घातले नाहीत तर ते त्यांनी कर्ज काढूनच उद्योग उभे केले असल्याचे त्यांनी सांगितले.जो माणूस चिकाटी धरून राहतो,तो त्या क्षेत्रामध्ये यशस्वी होतोच.त्यामुळे रेशीम शेतीमध्ये देखील थोडेफार चढ उतार आले म्हणून ही शेती न सोडता शेतकऱ्यांनी चिकाटी धरल्यास त्याचा त्यांना नक्की फायदा झाल्याशिवाय राहणार नसल्याचे विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच नर्सरीचे जसे महत्त्व आहे. तेवढेच चॉकी सेंटरचे महत्त्व असल्याचे सांगत चॉकी सेंटरमध्ये तापमान स्वच्छता रोगांच्या किडीचा प्रादुर्भाव यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काळजी घेणे खूप महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे काम केले तर यश तर नक्कीच मिळेल परंतु आपल्या उत्पादनाचा ब्रँड बनविला तर तो कायमस्वरूपी उत्पादनाचे साधन बनेल असे डॉ.ओंबासे यांनी सांगितले. शेतीला जोडधंदा म्हणून रेशीम शेती हा अत्यंत चांगला पर्याय असून शेतकऱ्यांनी रेशीम शेतीची कास धरून आपल्यासह इतर शेतकऱ्यांना या प्रवाहात आणून आर्थिक प्रगती साधावी असे आवाहनही डॉ ओंबासे यांनी केले.
डॉ.घोष म्हणाले की, शेतकऱ्यांनी या उपलब्ध सुविधेचा फायदा घेऊन रेशीम शेतीची कास धरून आपली प्रगती साधावी.
जिल्हा रेशीम अधिकारी आरती वाकुरे म्हणाल्या की,रेशीम शेती करणारे शेतकरी हे केवळ शेतकरी न राहता उद्योजक बनले पाहिजेत.रेशीम उत्पादनामध्ये धाराशिव राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे.यासाठी जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून रेशीम शेती वाढवली तर रेशीम उद्योजक व मार्गदर्शक शेतकरी बालाजी पवार यांनी शेतकऱ्यांनी रेशीमची लागवड करावी यासाठी त्यांना प्रेरणा देण्याचे काम केले असल्याचे त्यांनी विशेषत्वाने नमूद केले.
मनरेगाच्या माध्यमातून रेशीम लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध झाल्यामुळे त्याचा देखील शेतकऱ्यांना फायदा झाला व होत असल्याचे श्रीमती वाकुरे यांनी सांगितले.खामकरवाडी येथे रेशीम शेतीचे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार असून खामकरवाडी येथे लवकरच रेशीमचे हब उदयास येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.तसेच महिलांचे नियोजन कधी चुकत नसल्यामुळे रेशीम शेती करण्यासाठी महिलांनी देखील सहभाग वाढविला पाहिजे असे आवाहन करीत जिल्ह्यात १४ रेशीम चॉकी सेंटर तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

आयसीआय फाउंडेशनचे चेतन पाटोळे म्हणाले की,या फाउंडेशनने सीएसआर फंडामधून प्रायोगिक तत्त्वावर प्रथमच खामकरवाडी येथे प्रयोग केला असून तो यशस्वी झाला आहे.अशाच पद्धतीची आर्थिक मदत जिल्ह्यातील 51 गावांमध्ये करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. त्याबरोबरच खामकरवाडी येथे रेशीमचा धागा निर्मिती प्रकल्प उभा करण्यात येणार आहे. तर 27 एकर क्षेत्रावर आंबा लागवड करण्यात येऊ येणार असून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन माती परीक्षण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
व्हाईट गोल्ड चॉकी सेंटरचे अध्यक्ष अतुल लुगडे यांनी सांगितले की,मी 2005-06 पासून तुती शेती करीत आहे.मला प्रथमतः घरातून विरोध झाला.मात्र सोयाबीनच्या उत्पादनापेक्षा दुप्पट उत्पादन अर्धा एकरामध्ये पहिल्याच वर्षी मिळाल्यामुळे घरच्यांनी पुन्हा सहकार्याची भूमिका स्विकारल्याचे त्यांनी सांगितले.त्यामुळे मी इतर 11 शेतकऱ्यांना सोबत घेऊन हे सेंटर उभे केले आहे.गावातील प्रत्येक शेतकऱ्यांनी रेशीम शेतीची कास धरली व आजघडीला प्रत्येक शेतकऱ्याकडे रेशीम शेती आहे. ज्यांच्याकडे शेती नाही त्यांनी देखील भाडे तत्वावर शेती घेऊन रेशीम शेती सुरू केली असल्याचे त्यांनी सांगितले. तर पूर्वी येथील लोक रोजगारासाठी दुसऱ्या गावाला जात होते.मात्र आता इतर गावाचे लोक रोजगारासाठी इथे येत असून खामकरवाडी हे रोजगाराचे स्ट्रक्चर तयार झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रस्ताविकात बालाजी पवार यांनी रेशीम शेतकऱ्यांसाठी आजचा सुवर्ण दिवस असून रेशीम शेती ही सोन्याची खान असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी डॉ ओंबासे यांनी प्रथमच चॉकी सेंटरसाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून 5 लाख रुपये या चॉकी सेंटरला 24 तास सतत विद्युत पुरवठा व्हावा यासाठी स्वतंत्र डिपीसाठी 10 लाख रुपये असा एकूण 1 कोटी 67 लाख रुपये निधी उपलब्ध करून आहे.त्यामुळे जिल्ह्यात रेशीम अळ्यांचे उत्पादन करण्यासाठी चालना मिळाली. शेतकऱ्यांना त्या अळ्या पुरवठा करणे शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले.महत्त्वाचे म्हणजे जिल्ह्यात 10 हजार हेक्टर क्षेत्रावर रेशीम लागवड करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ ओंबासे यांनी जानेवारीपासून 15 बैठका घेऊन 9 चॉकी सेंटरला मंजुरी दिल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे.तर रेशीम कोष खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञान प्रबोधिनीचे थोरबोले यांनी केले. उपस्थितांचे आभार अतुल लुगडे यांनी मानले.कार्यक्रमाला आजूबाजूच्या गावातील रेशीम उत्पादक शेतकरी, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.