धाराशिव – वैभव पारवे
राज्यात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून दिवसेंदिवस राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
ह्याच पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या बैठकांचा सपाटा सुरू असून तिकीट वाटपासाठी खलबतं सुरू आहेत
धाराशिव लोकसभेसाठी ठाकरेंनी आपला पैलवान मैदानात उतरवला आहे. मात्र महायुती कडून नेमका कोणता उमेदवार असणार याचे अनेक तर्क-वितर्क मांडले जात आहेत.त्यामुळे आमचं ठरलं! असं अजून पर्यंत धाराशिव लोकसभेसाठी महायुती कडून अद्याप ही जाहीर केलं गेलं नाही.त्यामुळे ओमराजेंच्या विरोधात प्रतिस्पर्धी पैलवान कोण असणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
महायुती मधून मा.सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी, भाजप मधून राणाजगजितसिंह पाटील शिंदे गटातून आरोग्य मंत्री तानाजी सावंत,रवींद्र गायकवाड यांची नावे चर्चेत आहेत.
मात्र तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाल्याने त्यांना धाराशिव लोकसभेसाठी संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.मंत्री तानाजी सावंत यांनी सागर बंगल्यावर आपल्या पुतण्यासाठी जोरदार मोर्चा बांधणी केल्याची चर्चा आहे.त्यामुळेच धनंजय सावंत यांना खासदारकीचे तिकीट मिळू शकते अशी देखील चर्चा सावंत यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू असून सोशल मीडियावर धनंजय सावंत यांच्या भावी खासदार असा उल्लेख केलेल्या पोस्ट फिरत आहेत.ह्याच पार्श्वभुमीवर उद्या (गुरुवारी) परांडा येथील सोनारी येथे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवल्याने धनंजय सावंत यांनाच संधी भेटेल अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. जर धनंजय सावंत यांना तिकीट भेटलं तर ओमराजेंना टक्कर देत ही निवडणुक नक्कीच तुल्यबळ होणार ह्यात कोणतीही शंका नाही.