कळंब – शेतकऱ्यानी सोयाबीन विकू नये आपलं सरकार येणार आहे, आठ ते दहा दिवसात शेतकऱ्यांच सोयाबीन सात हजार रुपये दर देऊन सरकार घेणार आहे. या सरकार मध्ये ती हिंमत नाही त्याला शेतकऱ्यांच मन कळावे लागते तेव्हाच त्याच्या हिताचे निर्णय होत असतात असे मत आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केले. वडगाव (ज ) ता. कळंब येथील प्रचार सभेत बोलत होते.
यावेळी पाटील म्हणाले, या सरकारने शेतकरी अडचणीत असताना फक्त उद्योगपती धार्जिन निर्णय घेतले. शेतकऱ्यांना कधी दुष्काळ नशिबी आला तर कधी सततचा पाऊस तर कुठे अतिवृष्टीने बेजार केले. तेव्हा या सरकारला जराही पाझर फुटला नाही. शेतकऱ्यांच्या डोक्यावरचा कर्जाचा डोंगर वाढत गेला. पण त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी उद्धव ठाकरे सारखं मन त्यांच्यात नाही. पुन्हा एकदा आपल सरकार आल्यास पहिल्यांदा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचे वचन उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीने दिले आहे. जे अदानी अंबानीच्या कृपेने काम करतात त्यांना शेतकऱ्याच्या दुःखाची जाणीव कशी होईल असा प्रश्न आमदार पाटील यांनी उपस्थित केला.
हमीभाव केंद्र अजूनही सुरु झालेली नाहीत शेतकऱ्यांना कवडीमोल दराने सोयाबीन विकावं लागत आहे. पण माझं शेतकऱ्यांना सांगणं आहे, सोयाबीन सध्या विकू नये आपल सरकारच येणार आहे आणि तेव्हा हेच सोयाबीन आपण सात हजार रुपये दराने विकत घेण्याचा निर्णय सरकार घेणार असल्याचा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला आहे. जी गतं सोयाबीन व अन्य पिकाची झाली तशीच गतं आता हरबरा पिकाची करण्याचा डाव या सरकारने आखला आहे. हरभरा आयात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. आता हरभरा बाजारात येणार तेव्हा साहजिकच दर कमी मिळणार हे कोणी सांगण्याची गरज नाही. लोकसभेला शेतकऱ्यांनी ज्या प्रकारे भाजपला मतातून हिसका दाखवला असाच दणका आताही दिला तर पुन्हा केंद्रातील सरकार असे निर्णय घेताना दहा वेळा विचार करतील असाही टोला आमदार पाटील यांनी लगावला.