धाराशिव – धाराशिव नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ५ मधील जिजाऊ नगर परिसरात दोन दिवसांपूर्वी कोरड्या विहिरीमध्ये चार लहान कुत्र्यांची पिल्ले पडल्याची धक्कादायक घटना समोर आली. विहिरीत उतरण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या पायऱ्या नसल्यामुळे पिल्लांना बाहेर काढणे अत्यंत कठीण झाले होते. दोन दिवसांपासून पिल्ले विहिरीत अडकून पडल्याने त्यांना अन्न-पाण्याची तीव्र अडचण निर्माण झाली होती आणि त्यांचा मृत्यू होण्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली होती.
स्थानिक रहिवाशांनी नगरपालिकेतील प्रमुख लोकप्रतिनिधींशी संपर्क साधूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचे दिसून आले. अखेर नागरिकांनी प्रभागाचे नेतृत्व करणारे नगरसेवक अभिजित पतंगे यांच्याशी तात्काळ संपर्क साधला. घटनेची माहिती मिळताच पतंगे यांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली.
परिस्थितीची पाहणी करून पिल्लांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी त्यांनी तत्काळ उपाययोजना सुरू केल्या. त्यांनी सचिन कदम यांच्याशी संपर्क साधला. दोरीच्या सहाय्याने सचिन कदम हे विहिरीत उतरले आणि बकेटच्या मदतीने एकामागून एक चारही पिल्लांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले.
या धाडसी आणि तत्पर कार्यामुळे चार निष्पाप जीवांना अक्षरशः नवजीवन मिळाले. नगरसेवक अभिजित पतंगे यांच्या संवेदनशील आणि जबाबदार भूमिकेचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे. या कार्यात उमेश चव्हाण, अजिंक्य शिंदे आणि सचिन कदम यांनीही मोलाचे सहकार्य केले. जिजाऊ नगरमधील नागरिकांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानत, “अडचणीच्या वेळी धावून येणारा लोकप्रतिनिधीच खरा” अशी भावना व्यक्त केली.
नगरसेवक अभिजित पतंगे यांच्या या कृतीमुळे लोकप्रतिनिधींनी केवळ विकासकामेच नव्हे तर सामाजिक जबाबदारीही पार पाडली पाहिजे, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.











