धाराशिव – शालेय विद्यार्थ्यांना शासनाच्या नियमानुसार तात्काळ गणवेशाचे वाटप करण्यात यावे तसेच गणवेश खरेदी व वितरणाचा अधिकार शालेय व्यवस्थापन समितींमार्फतच राबविण्यात यावा, या मागणीसाठी धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या या निवेदनात, शैक्षणिक वर्ष सुरू होऊन बराच कालावधी उलटूनही जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश मिळालेला नसल्याची गंभीर बाब निदर्शनास आणून देण्यात आली. गणवेशाअभावी विद्यार्थी आणि पालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तसेच, शासनाच्या निर्णयानुसार गणवेश खरेदी व वाटपाची जबाबदारी अधिकारी व्यवस्थापन समितींना आहेत आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी ठाम मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. विद्यार्थ्यांना तातडीने गणवेश उपलब्ध करून न दिल्यास तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अधिकार डावलण्याचा प्रयत्न झाल्यास जिल्हा परिषदअध्यक्ष व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर यांच्यासह राजेंद्र शेरखाने, धनंजय राऊत, खलील सय्यद, सलमान शेख, गोरोबा झेंडे आणि बालाजी राठोड उपस्थित होते.











