धाराशिव – आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली असून उमेदवारांची चाचपणी देखील सुरू झाली आहे
धाराशिव जिल्ह्यात आगामी निवडणुकांसाठी महाविकास आघाडी एकत्र राहून लढणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यांच्या बैठकांचे सत्र देखील सुरू झाले असून इच्छुक उमेदवारांची चाचपणी देखील करण्यात आली आहे. तसेच पक्ष प्रवेश, राजीनामा सत्र, पद नियुक्त्या देखील धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणामध्ये पाहायला मिळत आहे.
दरम्यान धाराशिव जिल्ह्यातील परंडा नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी वेगळीच आघाडी झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. या आघाडीमध्ये भाजप, शिवसेना (उबाठा) राष्ट्रवादी (अजित पवार), राष्ट्रवादी (शरद पवार) यांची आघाडी झाली असून शिंदे सेनेला एकटे पाडल्याने धारशिवच्या राजकारणात खळबळ माजली आहे. याच पार्श्वभूमीवर माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी दोन दिवस मतदार संघांमध्ये घेतलेल्या कार्यकर्ता बैठकांमध्ये ‘ऐकला चलो रे’ चे नारा दिल्याने महायुती मध्ये फूट पडल्याचे स्पष्ट झाले होते. अशातच आज धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आगामी काळातील निवडणुका महायुती म्हणून आम्ही एकत्र लढणार असल्याचे माध्यमांसमोर जाहीर केले. एकीकडे शिंदे गटाचे उपनेते व आमदार तानाजी सावंत यांनी एकला चलो रे चा नारा दिला तर एकीकडे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी महायुती मधूनच लढणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र दोन्ही नेत्यांच्या विधानामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून महायुती म्हणून लढायचे की स्वतंत्र लढायचे? असा यक्ष प्रश्न निर्माण झाल्याने कार्यकर्त्यांची मोठी गोची झाली आहे.
मध्यंतरी डीपिडीसी च्या निधीवरून, रस्ते कामांच्या निधीवरून महायुतीतील भाजप व शिवसेना यांच्या कुरघोडीचे राजकारण जिल्ह्याला पहायला मिळाले होते. अशातच आता महायुती मधील प्रमुख नेत्यांच्या बैठका होऊन ‘दिलजमाई’ होत ‘हम साथ-साथ हैं’ ची घोषणा केली मात्र, सध्यातरी कार्यकर्ते ‘कन्फ्युजन ही कन्फ्युजन हैं’ अशा अवस्थेत असल्याचे चित्र धारशिवच्या राजकारणामध्ये पहायला मिळत आहे











