धाराशिव – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ हे दि.7 फेब्रुवारी रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून ढोकी येथे मुख्यमंत्री शिंदे यांची सभा होणार आहे.
ढोकी येथे होणाऱ्या जाहीर सभेतून ते जिल्हाभरातील शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत. या आधी मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाला होता.बऱ्याच दिवसा नंतर आता मुख्यमंत्री शिंदे हे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे कार्यकर्ते सभेच्या नियोजनासाठी कामाला लागले आहेत.
आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांचा दौरा अतिशय महत्वाचा समजला जात आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनजंय सावंत यांना खासदारकीचे डोहाळे लागले असून त्यांचे जिल्ह्यात अनेक ठिकाणी ‘भावी खासदार’ असे बॅनर झळकले आहेत.
धाराशिव चे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य मंत्री सावंत हे शक्ती प्रदर्शन करून खासदारकीचा उमेदवार आपल्याच घरातून देणार की दुसऱ्या कोणाचे नाव समोर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ढोकी येथील सभेतून मुख्यमंत्री शिंदे धाराशिव च्या लोकसभे काय भूमिका घेणार याची उत्सुकता सर्वांना तर लागलीच आहे त्याचबरोबर महायुतीतील जवळपास सर्वच घटक पक्षांकडून ‘धाराशिव’ मधून आम्हीच लढणार असे सांगितले जात आहे.त्याच पार्श्वभूमीवर इच्छुकांनी आपले दौरेही सुरू केले आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री जाहीर सभेतून धाराशिव लोकसभेबाबत कोणती भूमिका मांडतात याकडे जिल्ह्याच्या नजरा लागल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट) धाराशिव लोकसभा मतदारसंघातून आम्हीच लढणार, असा दावा करीत इच्छुकांनी गावोगावी दौरे, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीवर भर दिला आहे. तर, दुसरीकडे राज्याचे आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे पुतणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांचे भावी खासदार म्हणून शिवसैनिकांकडून बॅनरबाजी करण्यात येत असून धनंजय सावंत स्वतः इच्छुक असल्याचे त्यांनी कबूल केले आहे.तर दुसरीकडे जिल्हयातील भाजपने देखील वातावरण निर्मिती करत तयारी सुरू केली आहे.
दरम्यान मुख्यमंत्र्यांची ही सभा भव्यदिव्य व्हावी, यासाठी भैरवनाथ शुगरचे चेअरमन प्रा.शिवाजी सावंत, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्याकडून सभेच्या नियोनाची जय्यत तयारी सुरू असून नियोजनाची काळजी घेतली जात आहे.