धाराशिव – शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ओम राजेनिंबाळकर, आ.कैलास पाटील यांच्यासह त्यांचे दोन अंगरक्षक अशा एकूण चार जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहेत. मतमोजणी केंद्रात अंगरक्षकासह प्रवेश केल्यानं आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी केली होती, त्यानंतर आता निवडणूक आयोगाकडून ओम राजेनिंबाळकर, कैलास पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहेत.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओम राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्याविरोधात आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहेत. निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी ओमराजे व कैलास पाटील यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाची लेखी तक्रार केली होती. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी चौकशी करुन अहवाल सादर केला. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी त्यांचे उमेदवार प्रतिनिधी रेवणसिद्ध लामतुरे यांच्या माध्यमातुन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने सीसीटीव्ही तपासून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना दिले होते. त्यात मतमोजणी केंद्रात आमदार कैलास पाटील व उमेदवार खासदार ओम राजेनिंबाळकर हे नियमाला डावलून अंगरक्षकासह वावर करताना दिसून आले. त्यावरून आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे आता खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.