धाराशिव – जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होताच इच्छुक उमेदवारांनी जोरात तयारी सुरू केली आहे. तेरखेडा गट हा सर्वसाधारण जागेसाठी सुटल्याने तेरखेडा गटातून बिभीषण (अण्णा) खामकर निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
कोण आहेत बिभीषण (अण्णा) खामकर?
बिभीषण (अण्णा) खामकर हे तेरखेडा गावाचे अनुभवी राजकीय नेतृत्व, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामीण जनतेच्या मध्यस्थतेत ओळखले जाणारे नेते आहेत. त्यांच्या राजकीय आणि समाजसेवेमध्ये विविध पदे व जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत.
माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तसेच तेरखेडा ग्रामपंचायतचा त्यांनी 20 वर्षे कारभार पाहिला असून शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून देखील त्यांनी शिवसेना पक्षात जिल्हास्तरीय नेतृत्त्वाची भूमिका बजावली आहे.
खामकर यांचा राजकीय प्रवास
बिभीषण अण्णा खामकर यांचा राजकीय प्रवास सुरुवातीच्या काळातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून त्यांची ओळख होतीच त्याचबरोबर स्थानिक नेतृत्व मजबूत करून त्यांनी राजकारणात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. नंतरच्या काळात त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून जिल्हा परिषद सदस्य पद भूषवले. शिवसेना पक्ष फुटीनंतर त्यांनी आमदार तानाजी सावंत यांचे नेतृत्व स्वीकारून शिंदे सेनेत प्रवेश केला. त्यांची ही राजकीय वाटचाल त्यांच्या स्थानीक जनतेशी अधिक प्रभावी संवाद आणि पॉलिटिकल स्ट्रॅटेजी बदलण्यात महत्त्वाची ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
अद्याप, कोणत्या राजकीय पक्षाकडून बिभीषण खामकर हे निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत हे जरी स्पष्ट झाले नसले तरी कार्यकर्ते व हितचिंकांसोबत चर्चा करून खामकर हे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.











