मुंबई – कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सुरूवातीला आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी कॉंग्रेस सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिल्याने कॉंग्रेसमध्ये एकच खळबळ माजली आहे. येत्या १४ फेब्रुवारीला कॉंग्रेसच्या काही नेत्यांचा भाजप प्रवेश होणार असून यामध्ये नांदेड, धाराशिव आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही नेत्यांचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुकांपुर्वी कॉंग्रेसला मोठे खिंडार पाडण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत कॉंग्रेसचे अनेक बडे नेते देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
कोण-कोण करणार भाजपमध्ये प्रवेश?
चांदिवलीचे माजी आमदार नसीम खान
चचेंबुरचे माजी आमदार चंद्रकांत हंडोरे
उमरेडचे आमदार राजू पारवे
पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे
नांदेड दक्षिणचे मोहन हंबर्डे
चंद्रपुर, राजूराचे सुभाष धोटे,
रिसोड वाशिमचे अमित झनक
हे देखील अशोक चव्हाण यांच्यासोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यातच विश्वजीत कदम, जितेश अंतापूरकर, विधान परिषदेचे आमदार अमर राजुरकर हे देखील अशोक चव्हाण यांच्यासोबत असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, कॉंग्रेसमधील अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. कॉंग्रेसमधील गटबाजी आणि अंतर्गत राजकारणाला नेते कंटाळले आहेत. कॉंग्रेसमधील मुस्कटदाबी आणि मोदींच्या नेतृत्वातील भारताची प्रगती पाहता, अनेक नेत्यांना वाटतं की मुख्य प्रवाहात यायला हवं. त्यामुळे आमच्या कोण-कोण संपर्कात आहेत,भाजपमध्ये कोण-कोण येणार आहे. याबाबत मी इतकंच सांगेन की आगे-आगे देखो, होता है क्या अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.