धाराशिव – राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होताच राजकीय वातावरण तापू लागले आहे. पहिल्या टप्प्यात 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींच्या निवडणुका होणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांनी तयारीला वेग दिला आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका अनेक वर्षांनंतर होत असल्याने या निवडणुकांकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. संभाव्य उमेदवारांकडून मतदार संपर्क, कार्यकर्त्यांच्या बैठका, सामाजिक कार्यक्रमांमधील उपस्थिती वाढली असून गावागावात राजकीय हालचालींना सुरुवात झाली आहे.
दरम्यान, निवडणूक जाहीर होताच इच्छुकांनी वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या असून पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळवण्यासाठी लॉबिंग वाढले आहे. काही ठिकाणी तर उमेदवारीसाठी अंतर्गत स्पर्धा रंगताना दिसत आहे.
पहिल्या टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकांमुळे ग्रामीण राजकारणाला मोठी चालना मिळणार असून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सत्तेसाठी राजकीय पक्षांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
आगामी काळात उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रचाराचा धुरळा उडणार असून स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि नेतृत्वाची कसोटी या निवडणुकांत लागणार आहे.
कोणत्या ठिकाणच्या होणार निवडणुका?
पहिल्या टप्प्यातील ‘हे’ आहेत महत्त्वाचे जिल्हे
पहिल्या टप्प्यात प्रामुख्याने कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्ह्यांमध्ये मतदान पार पडेल.
यात खालील १२ जिल्हा परिषदांचा समावेश आहे.
कोकण विभाग : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
पुणे विभाग : पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.
छत्रपती संभाजीनगर विभाग : छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर.











