पाच जण अटकेत, कलाकेंद्रांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
धाराशिव – कळंब तालुक्यातील चोराखळी शिवारातील महाकाली कला केंद्रात तमाशा पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा त्याच्याच मित्रांकडून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी येरमाळा पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील साळेगाव येथील ३७ वर्षीय सतीश मुंडे असे मयत तरुणाचे नाव आहे. घटनेच्या दिवशी तो काही मित्रांसह धाराशिव जिल्ह्यातील महाकाली कला केंद्रावर बारी पाहण्यासाठी गेला होता. मित्रांनी दारू पाजून त्याला तमाशासाठी नेले आणि कार्यक्रम पाहून परत येत असताना जुन्या भांडणाचा राग मनात धरून त्याच्यावर हल्ला केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
आरोपींनी सतीश मुंडे याला लाथाबुक्क्यांनी पोटावर व छातीवर बेदम मारहाण केली. या मारहाणीमुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी शेख आजमुद्दीन, शेख रौफ, संजय गीते, मधुकर इंगळे आणि दत्ता तोंडे अशी आरोपींची नावे असून पोलिसांनी पाचही जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिस उपनिरीक्षक भोजगुडे पुढील तपास करत आहेत. मयताच्या वडिलांनी भागवत मुंडे यांनी याबाबत तक्रार दिली आहे.
दरम्यान, या घटनेमुळे धाराशिव जिल्ह्यातील कलाकेंद्रांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जिल्ह्यातील तुळजाई, पिंजरा, साई, गौरी आणि कालिका या पाच कलाकेंद्रांचे परवाने जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी कायमस्वरूपी रद्द केले होते. मात्र त्यापैकी काही आदेशांना विभागीय आयुक्तांकडून स्थगिती देण्यात आली आहे. कागदोपत्री बंद असलेली काही कलाकेंद्रे छुप्या मार्गाने सुरू असल्याची चर्चा आहे.
सध्या महाकाली कला केंद्र हे एकमेव सुरू असल्याचे सांगितले जात असून या केंद्राचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक रितु खोखर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. मात्र यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. महाकाली केंद्रासंदर्भातील प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने याचाच फायदा केंद्र चालक घेत असल्याची चर्चा परिसरात आहे.
या घटनेमुळे बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या कलाकेंद्रांवर कारवाई करण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली असून प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.











