धाराशिव – धाराशिव जिल्ह्यातील वाघोली येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सापळा रचून तलाठी भूषण चोबे व त्यांचे खाजगी लिपीक भारत मगर यांना 4000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. ही कारवाई लाचलुचपत विभागाच्या धाराशिव युनिटने यशस्वीरित्या पार पाडली आहे.
प्रकरणाचा तपशील:
तक्रारदाराने त्यांच्या वडिलांच्या नावावरील गट क्रमांक १५/१० या शेतजमिनीवरील कुळाचे नाव कमी करण्यासाठी तहसील कार्यालय, धाराशिव येथे अर्ज केला होता. यावर तहसीलदार धाराशिव यांनी मंडळ अधिकारी तेर यांना स्थळ पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. या अहवालासाठी तलाठी भूषण चोबे व त्यांचा खाजगी लिपीक भारत मगर यांनी तक्रारदाराकडे 5000 रुपयांची लाच मागितली होती.
तक्रारदाराने लाचलुचपत विभागाशी संपर्क साधून तक्रार दिल्यानंतर पडताळणी करण्यात आली. त्यात आरोपींनी 4000 रुपयांवर तडजोड करून लाच स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज दुपारी सापळा रचण्यात आला.
सापळा कारवाई आणि अटक:
तलाठी भूषण चोबे यांनी खाजगी लिपीक भारत मगर यांच्यामार्फत तक्रारदाराकडून 4000 रुपये लाच घेतली. त्याचवेळी सापळा पथकाने कारवाई करून दोघांनाही रंगेहाथ पकडले. आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
जप्त सामग्री: तलाठी भूषण चोबे यांच्याकडून:
*5 ग्रम वजनाची सोन्याची अंगठी
*30 ग्रम वजनाचा चांदीचा कडा
*समसंग मोबाईल
- पार्कर कंपनीचे पेन
- डेल कंपनीचा शासकीय लपटॉप
- 4000 रुपये लाच रक्कम
*अतिरिक्त 1090 रुपये रोख
*सॅमसंग कीपड मोबाईल
आरोपींच्या घरी झडती सुरू असून, मोबाईल तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत.
गुन्हा दाखल आणि कायदेशीर प्रक्रिया:
भूषण चोबे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत कलम 12 तर भारत मगर यांच्याविरुद्ध कलम 7A नुसार धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींचा पुढील तपास लाचलुचपत विभाग करत आहे.
कारवाई करणारे अधिकारी व पथक:
या कारवाईचे नेतृत्व पोलीस उप अधीक्षक सिध्दाराम म्हेत्रे यांनी केले. सापळा पथकात पोलीस अंमलदार नेताजी अनपट, आशीष पाटील आणि नागेश शेरकर यांचा समावेश होता. मार्गदर्शन पोलीस अधीक्षक संदीप आटोळे आणि अपर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव यांनी केले.
तक्रार करण्यासाठी संपर्क:
भ्रष्टाचाराची तक्रार टोल फ्री क्रमांक 1064 वर करता येईल. तसेच पोलीस अधीक्षक संदीप आटोळे (मो. 9923023361) किंवा पोलीस उप अधीक्षक सिध्दाराम म्हेत्रे (मो. 9594658686) यांच्याशी संपर्क साधावा.
या कारवाईमुळे महसूल प्रशासनातील भ्रष्टाचार उघड झाला असून, लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचे संकेत मिळाले आहेत. नागरिकांनी अशा प्रकारांचा विरोध करताना लाचलुचपत विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.