पुणे : पहिलं आरक्षण रद्द झाल्यावर २ वर्षे कोणीच काही बोललं नाही. परंतु आरक्षणासाठी आज शासनाची दमछाक केली जात आहे. आरक्षण आताच द्या ही भूमिका घेतली जात आहे. पण ते कायद्याच्या चौकटीत बसलं पण पाहिजे ना. असं म्हणत आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं. त्यावर आता मनोज जरांगे पाटलांकडून प्रत्युत्तर देण्यात आलंय.
श्रीमंतीची शायनिंग दाखवू नका. आम्ही काय केलं हे विचारणारा हा कोण ? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी तानाजी सावंतांना केला आहे. आरक्षण कशानं मिळेल हे वेळ आल्यावर सांगू. मराठ्यांच्या मुलांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. विरोधक मराठ्यांच्या जीवावर उठले आहेत तानाजी सावंत यांना काय वादळ दिसलं माहिती नाही. तुमची मस्ती आम्हाला दाखवू नका. असंही मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांना आरक्षण दिलं होतं. पण तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला ते सर्वोच्च न्यायालयात का टिकवता आलं नाही? असं प्रश्नही मंत्री सावंत यांनी विचारला होता. यावर मनोज जरांगे म्हणाले, “ते तुम्हीच विचारा ना. तुम्हाला फक्त बाकीच्या गप्पा मारता येतात का? तेही बघा ना जरा… श्रीमंतीची शायनिंग मराठ्यांजवळ नाही दाखवायची. ती तुमच्याजवळच ठेवायची. तुमची मस्ती तिकडेच दाखवायची. आरक्षण का टिकलं नाही, याचा शोध तुम्हीच घ्यावा आणि मराठा समाजाला सांगावं. उगीच मस्तीतल्या गप्पा कशाला मारायच्या.”
दरम्यान, राज्य सरकारने मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता मराठा आरक्षण विरूद्ध ओबीसी आरक्षण असा वाद पेटला आहे. आज हायकोर्टात ओबीसी आरक्षणाच्याबाबत सुनावणी देखील पार पडली. तर येत्या १७ तारखेला ओबीसी आरक्षण बचाव यासाठी ओबीसी नेत्यांचा महामोर्चा होणार आहे.