मुंबई – काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पूत्र आणि कर्नाटकमधील मंत्री प्रियांक खर्गे यांनी वीर सावरकरांची प्रतिमा विधानसभा सभागृहातून काढण्याच्या वक्तव्यावरून आता भाजप आक्रमक होताना दिसत आहे. खर्गेंच्या या वक्तव्याचा दाखला देत महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. सावरकरांचा अवमान सुरू असताना मूग गिळून गप्प बसणार का? असा थेट सवाल त्यांनी केला आहे. तेव्हा ठाकरेंकडून कसे उत्तर मिळते हे पहावे लागणार आहे.
कर्नाटकचे माहिती व प्रसारण मंत्री प्रियांक खर्गे यांनी वीर सावरकरांविरोधात केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे. प्रियांक खर्गे म्हणाले की, आपण विधानसभेचा अध्यक्ष असतो तर बेळगाव येथील सुवर्णसौध विधानसभेतून वीर सावरकरांचा फोटो काढून टाकला असता. एवढेच नव्हे तर पुढे ते म्हणाले की, सावरकरांचे योगदान काय? सावरकरांना वीर ही पदवी कशी मिळाली हे भाजपने सांगावे? सावरकरांना वीर ही पदवी कोणी दिली? असे प्रश्न त्यांनी भाजपला विचारले. प्रियांक खर्गे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांना ही पक्षाची भूमिका आहे का? असे विचारले असता ते म्हणाले की, सावरकरांचे चित्र विधानसभेत नसावे, असे माझे ठाम मत आहे. भाजपला त्याचा त्रास असेल तर ती त्यांची समस्या आहे. माझे मत आहे की, ज्यांची विचारधारा द्वेष आणि फूट पाडत असेल तर त्यांचा फोटो तिथे नसावा, सावरकरांचे चित्र तेथे नसावे असे माझे मत आहे. पक्षाचे मत आहे की, नाही मला माहिती नाही असेही स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले.
(हे देखील वाचा – आम्हाला दिल्लीची कटपुतली म्हणणाऱ्यांनो…)
बावनकुळे यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र, कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान काय? आणि त्यांचा पराक्रम काय? असं विचारून खर्गेंनी संपूर्ण देशभक्तांचा अपमान केला आहे. काँग्रेसने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करण्याची एकही संधी सोडली नाही. आधी राहुल गांधी आणि आता खर्गे सावरकरांवर टीका करताहेत पण एक लक्षात ठेवा, या देशातील जनता स्वातंत्र्यवीरांचा अवमान कधीच सहन करणार नाही. या अवमानाबद्दल मतदारही काँग्रेसला धडा शिकवतील. पण मला ‘इंडी’ आघाडीचे घटक असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनाही विचारायचे आहे की, काँग्रेसनं केलेल्या या अवमानाचा तुम्ही निषेध करणार की स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान सुरू असताना मूग गिळून गप्प बसणार? असा थेट सवाल बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे.