वाशी – या वर्षी स्वतःच्या शेतात कमी पीक निघाले मग घर खर्च भागवायचा कसा? या विवंचनेतून वाशी तालुक्यातील लाखणगाव येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दि.18 डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली.
याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की दत्तात्रय रामा मोरे (वय 55 वर्ष) या वृद्ध शेतकऱ्याने कष्ट करून शेतामध्ये रब्बी पीक घेतले होते. आधी पावसाने ओढ दिल्यामुळे पिकाला फटका बसला होता. त्यानंतर कसेबसे पीक आल्यानंतर हिशोब केला असता जेवढे पेरले तेवढे सुद्धा निघाले नाही हे दुःख सहन न झाल्याने दत्तात्रय मोरे यांनी शेतामध्ये झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची फिर्याद मयताच्या मुलाने पोलीसात दिल्यामुळे वाशी पोलीसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून, शवविच्छेदन प्राथमिक आरोग्य केंद्र पारा येथे करण्यात आले असून पुढील तपास वाशी पोलीस स्टेशन करत आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.