पुढच्या आठवड्यात इंडियन प्रीमिअर लीग 2024 हंगामाचा लिलाव पार पडणार आहे. आयपीएल च्या इतिहासात पहिल्यांदाच आयपीएल लिलाव परदेशात आयोजित केला जात आहे. 2024 चा लिलाव दुबईत आयोजित केला जाणार आहे. मात्र, या लिलावापूर्वीच मुंबई इंडियन्स संघाने एक धक्कादायक निर्णय घेतला, ज्यामुळे त्यांना आता मोठा फटका बसू लागला आहे.
रोहितला काढून हार्दिकला बनवले कर्णधार
पाच वेळचा चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्स संघाने शुक्रवारी (दि.15 डिसेंबर) कठोर निर्णय घेतला. त्यांनी रोहित शर्मा याला कर्णधारपदावरून हटवले आणि हार्दिक पंड्या याला संघाचा नवीन कर्णधार बनवले. अशात चाहत्यांकडून मुंबई इंडियन्स संघावर चोहोबाजूंनी टीकास्त्र डागले जात आहे. हा निर्णय आता मुंबईचा अंगलट येऊ लागला आहे
मुंबईचे इंडियन्सचे मोठे नुकसान
मुंबईला पाच वेळा आयपीएल चॅम्पियन बनवणाऱ्या रोहितला कर्णधारपदावरून हटवताच चाहत्यांनी देखील मुंबईची साथ सोडली आहे. मुंबई इंडियन्सच्या इंस्टाग्राम अकाऊंटला तब्बल 3 लाखांहून अधिक चाहत्यांनी अनफॉलो केले आहे. एकीकडे, जेव्हा रोहित शर्मा कर्णधार होता, तेव्हा संघाचे फॉलोअर्स 13.2 मिलियन होते. मात्र, हार्दिकला कर्णधार बनवताच संघाच्या फॉलोअर्सची संख्या 12.9 मिलियन झाली आहे.
चाहत्यांचा विरोध, सोशल मीडियावर ट्रेंड
चाहत्यांनी रोहितला कर्णधारपदावरून हटवण्याचा पूर्णपणे विरोध केला आहे. चाहत्यांनी यावर पूर्णपणे माजी कर्णधार रोहित शर्माला पाठिंबा दिला आहे. तसेच, संघाला अनफॉलो करण्याची मोहीम चालवली आहे. यासोबतच रोहितला कर्णधारपदावरून हटवण्याची बातमी समोर येताच, संघ एक्स (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही ट्रेंड होताना दिसून येत आहे.
चाहत्यांचा रोहितला पाठिंबा
दुसरीकडे, आयपीएल 2024, कर्णधारपद, हिटमॅन, शेम ऑन एमआय आणि अंबानी यांसारख्या शब्दांचा वापर सातत्याने काल रात्रीपासून ट्रेंडमध्ये होत आहे. चाहते वेगवेगळ्या पोस्ट आणि कमेंट्स करत आपला राग व्यक्त करत आहेत. काहींनी तर मुंबईची जर्सी आणि टोपीही जाळली आहे. यावरून दिसते की, रोहितला कर्णधारपदावरून हटवण्याचा निर्णय मुंबईला किती महागात पडू लागला आहे.