नवी दिल्ली – अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि निवडणूक चिन्हांवर निवडणूक आयोगात सुरू असलेली सुनावणी आज पूर्ण झाली. आज निवडणूक आयोगासमोर या सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर दोन्ही गटाकडून युक्तिवाद करण्यात आला. यावेळी अजित पवार गटाचे वकील मुकुल रोहतगी यांनी आपला युक्तिवाद पूर्ण केल्यानंतर शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी प्रतिवाद केला. दरम्यान, आजच्या सुनावणीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल राखून ठेवला असून येत्या दोन ते तीन आठवड्यात निकाल येण्याची शक्यता आहे.
शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी म्हणाले, आज युक्तिवाद संपली आहे. निवडणूक आयोगाने निर्णय राखून ठेवला आहे. तसेच आमचे मत लेखी स्वरूपात द्यायला सांगितली आहे. त्यामुळे आता निर्णय निवडणूक आयोगाच्या हाती आहे. परंतु अजित पवार गटाकडून स्पष्ट आले आहे की, संघटनेचं मत विचारात घेऊ नका. त्यामुळे हे स्पष्ट होतं की त्यांच्याकडे संघटना नाही, हे त्यांच्या हरण्याचा द्योतक आहे.
मनु सिंघवी म्हणाले की, २०१९पासून आमच्यात वाद होते, असे अजित पवार गटाने सांगितले आहे. संविधानातील त्रुटी आणि इतर गोष्टी त्यांनी आधी सांगितल्या नव्हत्या. हे सगळं त्यांनी पहिल्यांदा ३० जूनला सांगितले. एकीकडे ते सांगत आहेत की, २०१९ पासून वाद आहे आणि मात्र पद घेतााना काही बोलत नाहीत. परंतु राष्ट्रवादी पक्षाची स्थापना शरद पवार यांनी केली आहे. त्यांच्याशिवाय पक्ष कसा काय असू शकतो? असा सवाल शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी उपस्थित केला आहे.
(हे देखील वाचा – सावरकरांचा अपमान होताना मूग गिळून गप्प बसणार का?)
अजित पवार गटाचे वकील मुकुल रोहोतगी म्हणाले की, सुनावणी संपली आहे. २ ते ३ आठड्यात निकाल येण्याची शक्यता आहे. दरम्यान, आजच्या सुनावणीवेळी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून खासदार सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड आणि मेहबूब शेख हे उपस्थित होते. तर अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे, पार्थ पवार, सुरज चव्हाण आदी उपस्थित होते.