पुणे – राज्यात सध्या ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद सुरू आहे. मराठ्यांना ओबीसीतून सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याकडून करण्यात येत आहे. तर त्यांच्या या मागणीला ओबीसी नेते आणि सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी थेट विरोध करत यासाठी ओबीसी बचाव मोहीम सुरू केली. या पार्श्वभूमीवर ओबीसी एल्गारचा मेळावा पुण्यातील इंदापूर येथे पार पडला. या सभेतून ओबीसी नेत्यांनी मनोज जरांगे यांच्यावर सडकून टीका केली आहे. यावेळी ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी देखील मराठा आमदारांना आणि मराठ्यांना इशारा दिला आहे.
सुप्रीम कोर्टाने सांगितले की मराठा समाजाला आर्थिक मागास वर्गातून आरक्षण मिळणार नाही. तरीही त्यांना त्यामधून आरक्षण हवे आहे. त्यांना भोग भागायचे नाहीत. फक्त सर्टिफिकेट हवे आहे. असे सर्टिफिकेट आम्ही त्यांना मिळवू देणार नाही. भुजबळांनी आता आम्हाला सांगितले आहे की सोमवारी अधिवेशनात मराठा आरक्षणाचा ठराव प्रारित होणार आहे. विधानसभेच्या सर्व आमदारांना मी सांगू इच्छितो की, जर तुम्ही विधानसभेत ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आवाज उठवला तर आम्ही एक-एक को चुन-चुनकर मारेंगे, तुम्हाला सोडणार नाही, असा इशारा प्रकाश शेंडगे यांनी इंदापूर येथील ओबीसी एल्गार सभेत बोलताना दिला.
(हे देखील वाचा – तर दादागिरीनेच उत्तर देऊ; भुजबळांचा जरांगेंना इशारा)
तर, शिंदे, फडणवीस, अजितदादा तुमचे ड्रोन पाठवा आणि बघा इथे ओबीसी किती जमलाय. ओबीसी आरक्षणाचे रक्षण करण्यासाठी आम्ही जीवाची बाजी लावत आहोत. मराठा समाजात ओबीसीमध्ये आरक्षण घालण्याचे जे षडयंत्र सुरू आहे. त्यासाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत. त्यामुळे आता छगन भुजबळ यांनी आतील लढाई लढावी, बाहेरची लढाई आम्ही लढू. यांच्यातील काही लोकांनी आता भुजबळांना टार्गेट करायला सुरू केले आहे. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही एक भुजबळ पाडला तर आम्ही १६० पाडू. हे आता मी पश्चिम महाराष्ट्रात बोलतोय, हे मी आधी मराठवाड्यात बोललो आहे. हे मी आता पुन्हा बोलत आहे. मराठा आमदारांच्या तीन विकेट पडल्या आहेत, १६० पैकी जतमध्ये जाऊन मी एकच कार्यक्रम करून आलो. आता दौंडमध्ये मराठा आमदार आहे त्याचा पण कार्यक्रम करू. आता सर्व ओबीसी एकत्र झालेत त्यामुळे आता यांचा सरपंच पण निवडून येत नाही. दौंड तालुक्यात १२ पैकी ११ ओबीसी सरपंच निवडून आले फक्त एक मराठा आला. आता यांचा कार्यक्रम करण्यास सुरुवात झाली आहे, असे म्हणत प्रकाश शेंडगे यांनी इशारा दिला.