मुंबई – मुंबईतील मंत्रालय परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांचे ‘भावी खासदार’ असे बॅनर लावण्यात आले आहे. दरम्यान, सध्या शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे या बारामतीच्या खासदार आहेत. त्यानंतर आता सुनेत्रा पवारांचे बॅनर लागल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मंत्रालयाजवळ असलेल्या अजित पवार गटाच्या कार्यालयाबाहेर हे बॅनर लागले आहे. ‘बारामती लोकसभेच्या भावी खासदार’ असे या बॅनरवर लिहिले आहे. त्यामुळे आता नणंद आणि भावजई एकमेकींच्या विरोधात निवडणुक लढवणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
कर्जत येथे नुकत्याच पार पडलेल्या अजित पवार गटाच्या शिबीरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभेच्या सर्व जागा लढवणार असल्याचे वक्तव्य केले होते. “लोकसभा निवडणुकीत बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड या आपल्याकडे असलेल्या जागा आपण लढवणारच आहोत. पण त्याबरोबर ठाकरे गटाकडे ज्या जागा आहेत, त्यातल्याही काही जागा आपण लढवण्याचा प्रयत्न करणार आहोत,” असे ते म्हणाले होते. त्यानंतर आता सुनेत्रा पवार यांचे बॅनर लागल्याने पुन्हा एकदा चर्चा रंगल्या आहेत.