छत्रपती संभाजीनगर – सुप्रसिद्ध लेखक, पत्रकार, निवेदक, संघटक संदीप काळे (मुंबई) यांना यावर्षीचा ‘रूपाली दुधगांवकर’ राष्ट्रीय साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती शिवार चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष, प्राचार्य डॉ. श्रीधर भोंबे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.
संदीप काळे हे नामवंत लेखक आहेत. त्यांचा जन्म १५ ऑगस्ट १९८२ ला नांदेड जिल्ह्यातील पाटनूर या गावात झाला. संदीप काळे यांचे वडील रामराव काळे हे शेतकरी आहेत. त्यांच्या आई कमलबाई ऊर्फ मुक्ताबाई या गृहिणी आहेत. अनेक टीव्ही कार्यक्रमांचे संपादक म्हणून काम केलेले संदीप काळे आज राज्यातील आघाडीच्या दैनिकात संपादक म्हणून कार्यरत आहेत.
आतापर्यंत मराठी, हिंदी आणि इंग्रजीतून संदीप काळे यांची ६७ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. मु. पो. आई, ट्वेल्थफेल, ऑल इज वेल, प्रेमसेतू या चार पुस्तकांनी खपाचे सर्व विक्रमी रेकार्ड केले आहेत. ही चारही पुस्तके सर्व भाषांत आली असून अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमाला लागलेली आहेत.
वर्ल्ड रेकार्ड, इंडिया बुक रेकार्ड आणि लिमका बुक रेकार्डमध्ये संदीप काळे यांनी लिखाणाच्या माध्यमातून अनेक रेकार्ड केले आहेत. साहित्य, शासन, सामाजिक संस्था आणि पत्रकार संघातर्फे संदीप काळे यांना आतापर्यंत ३८० पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी आतापर्यंत एकूण २६ देशांचा अभ्यास दौरा केला आहे. अनेक पत्रकारिता महाविद्यालयांत त्यांनी प्राध्यापक म्हणूनही सेवा बजावली आहे. काळे यांचा ‘भ्रमंती लाईव्ह’ हे सदर खूप लोकप्रिय आहे. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या देशातील नंबर एकच्या पत्रकार संघटनेचे संदीप काळे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’मध्ये देशात सदोतीस हजार पत्रकार सदस्य काम करतात. आज १९ देशांत ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे काम पोहचले आहे. पत्रकार संदीप काळे यांचे शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक कार्य लक्षात घेऊन, त्यांना रूपाली दुधगांवकर हा मागील २२ वर्षांपासून दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरूप २१ हजार रुपये रोख आणि असे आहे. त्रीसदस्यीय निवड समितीने संदीप काळे यांच्या नावाची एकमताने निवड केली. या पुरस्काराचे वितरण लवकरच मान्यवरांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात येणार आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. श्रीधर भोंबे यांनी दिली. पत्रकार परिषदेला उप-प्राचार्य प्रा. मुंजाजी दाभाडे, डॉ. विलास पाटील, प्रा. पांडूरंग निळे, गजानन खैरीकर यांची उपस्थिती होती. आतापर्यंत कवयित्री अनुराधा पाटील, रंगनाथ पठारे, कवी भुजंग मेश्राम, शाम मनोहर, अरुण काळे, प्राचार्य भगवान देशमुख, जयराम खेडेकर, भ. मा. परसवाळे, संजीवनी तडेगावकर, डॉ. किशोर सानप, श्रीधर अंभोरे, सुचिता खल्लाळ, श्रीकांत देशमुख, विद्याधर म्हैसकर, इंद्रजित घुले, डॉ. पृथ्वीराज तौर, डॉ. प्रज्ञा दया पवार, मंगेश काळे, डॉ कविता मुरुमकर, डॉ. मीनाक्षी पाटील या मान्यवर सहित्यिकांना ‘रूपाली दुधगांवकर’ राष्ट्रीय साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.