पुणे – महायुतीत अद्याप जागावाटप झालेले नाही. प्रत्येक पक्ष आपापल्या मतदारसंघावर दावा करत आहे. अशातच महायुती सरकारमध्ये सामील झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर मतदारसंघावर दावा केला आहे. अजित पवार यांनी शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांना ‘ओपन चॅलेंज’ दिले आहे. त्यानंतर हा मतदारसंघ आणि आगामी लोकसभा निवडणूक याची राज्यात जोरदार चर्चा रंगली आहे. अशातच अजित पवार यांनी या मतदारसंघावर आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी मोठी खेळी खेळण्याच्या तयारी केल्याची माहिती आहे. अमोल कोल्हेंना धोबीपछाड देण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा जुना शिलेदार आणि सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना नेत्याला मैदानात उतरवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेचे वरिष्ठ नेते शिवाजीराव आढळराव पाटील हे अजित पवार गटात प्रवेश करण्याच्या तयारी असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
अजित पवार यांनी काल बोलताना अमोल कोल्हे यांच्यावर घणाघात केला आहे. अमोल कोल्हे यांना आगामी निवडणुकीत पाडणार असल्याचं अजित पवार म्हणाले. त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका उत्तम बजावली होती. पण शिरूरमध्ये आम्ही पर्याय देणार…. तुम्ही काळजीच करू नका. तिथे असलेला उमेदवार निवडूनच आणणार, असं अजित पवार यांनी म्हटलं.
अमोल कोल्हे यांना खुले आव्हान दिल्यानंतर अजित पवार नेमका कोणता उमेदवार कोल्हेंच्या विरोधात देणार याची चर्चा होत होती. आता मात्र सूत्रांकडून महत्वाची माहिती मिळाली आहे. अमोल कोल्हे यांना टक्कर देण्यासाठी अजित पवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना मैदानात उतरवणार असल्याची माहिती आहे.
शिरुर लोकसभा मतदारसंघात तत्कालीन शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना सेनेनं पुन्हा उमेदवारी दिली होती. तर आढळराव यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं अमोल कोल्हे यांना रिंगणात उतरवलं होतं. या निवडणुकीत कोल्हेंचा विजय झाला होता. तेव्हा आता कोल्हेंचा पराभव करण्यासाठी अजित पवार तेच जुने नेते मैदानात उतरवणार का? की, नवीन चेहरा देणार हे पहावे लागणार आहे.