बीड – मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटलांना सरकारने दिलेली २४ डिसेंबरपर्यंत तारीख संपत आली आहे. परंतु सरकारने मराठा आरक्षणाबाबत अजूनही ठोस उपाय शोधला नाही. त्याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटलांची २३ डिसेंबरला बीडमध्ये भव्य सभा होणार आहे. यावेळी रॅली देखील निघणार असून त्याची जय्यत तयारी सध्या बीडमध्ये सकल मराठा बांधवाकडून केली जात आहे.
मराठा आरक्षणाबाबत राज्यातील वातावरण कमालीचं तापलंय. त्याचमुळे बीडमधील सभा ही जंगी होणार असून त्याची मोठी तयारी करण्यात आली आहे. या सभेला लाखोंच्या संख्येने गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर विशेष पोलिस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण, पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सभास्थळाची पाहाणी केली. सभेच्या अनुषंगाने पोलिस प्रशासन आणि मराठा समन्वयकांमध्ये चांगला समन्वय असून ज्या बाबी महत्वाच्या वाटल्या त्यावर चर्चा करण्यात आली.
यातच लाखोंच्या संख्येने मराठा बांधव सभेसाठी येणार असल्याने तब्बल तीन टन खिचडी, ट्रकभर केळी आणि अन् चार लाख पाण्याच्या बाटल्या लोकांसाठी आयोजकांकडून करण्यात आली आहे. या सगळ्यांचा खर्च मराठा समाजाकडून करण्यात आला असून ही होणारी सभा ऐतिहासिक होणार आहे. अगदी शांततेच ही सभा पार पडणार असल्याचा विश्वास समन्वयकांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, बीडमध्ये मनोज जरांगे पाटलांची जंगी रॅली निघणार आहे. त्या सर्व मार्गावर भगव्या पताकांनी मैदान सजले असून रस्तेही भगवामय झाले आहेत. शहरातील सर्वच महापुरूषांच्या पुतळ्याचे सजावट करण्यात आले असून धुळे रस्त्यावरील पाटील मैदानात १०० एकरात भव्य सभा होणार आहे. या सभेतून मनोज जरांगे पाटील आता सरकारला काय इशारा देणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.