धाराशिव – सचिन कोरडे
धाराशिव जिल्ह्यातील भूम-परंडा-वाशी मतदारसंघातील वाशी तालुका हा कायम विकासाची दातखीळ बसलेला तालुका म्हणुनच ओळखला जातो आहे.
2009च्या पूर्वी वाशी-कळंब हा राखीव मतदारसंघ होता. वाशीकरांनी विधानसभा असो वा लोकसभा कायम शिवसेनेला भरभरून मतदान दिले.
अगदी एका सर्वसामान्य कुटुंबातील महिला कल्पना(ताई) नरहिरे यांच्या शिरपेचात आमदारकीचा व खासदारकीचा तुरा बसवायला वाशीकरांचे ही खूप मोठे योगदान होते.
मतपेटीतून मिळालेले भरभरून प्रेम कल्पना(ताई) नरहिरे यांनी कमी होऊ दिले नाही.
माजी आमदार बाईंनी कायम भीषण पाणीटंचाईच्या झळा सोसणाऱ्या वाशी शहरातील नागरिकांसाठी आरसोली-वंजारवाडी येथून वाशी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महत्वकांक्षी योजना राबवली, पाण्यासाठी रानोमाळ करत फिरणाऱ्या महिलांच्या डोक्यावरील पाण्याची घागर माजी आमदार बाईंनी उतरवली,त्यानंतर या लोकप्रिय माजी आमदार कल्पना(ताई) नरहिरे यांची ओळख “पाणी वाली बाई”अशीच निर्माण झाली.

याच नरहिरे(ताईंनी) वाशी शहराला 26/6/1999 रोजी तालुक्याच रूप देऊन एक अभिमानास्पद वैभव प्राप्त करून दिले.
कळंब तालुका व भूम तालुक्यातील एकूण 62 गावे वाशी तालुक्यामध्ये समाविष्ट करण्यात आली.
वाशी तालुक्यातील जाणकार म्हणतात,भूम परंडा चे माजी आमदार यांनी वाशी तालुक्याच्या विकासासाठी काहीच केले नाही.मात्र स्वतःच्या मतांची गोळा बेरीज शाबूत ठेवण्यासाठी वाशी तालुक्यामधील अगदी हाकेच्या अंतरावरील गावे पुन्हा भूम तालुक्यात समाविष्ट केली.

आज चोवीस वर्ष उलटले तरीही तालुक्यातील समस्यांचा पाढा काही संपलेला नाही.
अनेक आजी-माजी लोक प्रतिनिधीनीं नुसत मतदानापुरते जाहीरनामे वाचून वाशी तालुक्यातील जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत.
याच तालुक्यातील हरवलेल्या विकासाचा आढावा आधुनिक केसरी कडून घेण्यात आला
मागील २४ वर्षांपासून अनेक भागात रस्त्यांची कामे झाल्याचे दिसून येत नाही.
कायम खंडित होणारा वीज पुरवठा व वीज नसलेली गावे, महिना-महिना पिण्याच्या पाण्यासाठी तहानलेली गावे तालुक्यांमध्ये प्रकर्षाने दिसून येतात.
वाशी तालुक्याच्या विकासात भर घालणारी ही कामे कधी होणार?
तालुक्यातील क्रीडा संकुलाचा प्रश्न अनेक वर्षापासून रखडला आहे. तालुक्यातील शाळा, महाविद्यालयातील खेळांडूनी मुलभूत सुविधा नसतानाही विविध क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी करून मोठे यश मिळविले आहे. क्रीडा संकुलाअभावी खेळाडूंची प्रचंड गैरसोय होत असून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर देखील त्याचा विपरित परिणाम होत आहे. त्यामुळे तालुक्यातील विविध राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याप्रकरणी लक्ष घालून वाशी तालुक्यात भव्य क्रीडा संकुल उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी खेळाडूंसह क्रीडा प्रेमी नागरिकातून होत आहे.
वाशी शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालयातही खेळाडूंची विशेष अशा सोयी- सुविधा उपलब्ध नाहीत. तज्ञ क्रीडा प्रशिक्षक उपलब्ध नाहीत.वाशी तालुक्यात विविध क्रीडा प्रकारातील खेळाडूंची संख्या मोठी आहे. वाशी हे तालुक्याचे ठिकाण असताना देखील एकही हक्काचे मैदान नाही. वाशी येथे तालुक्याच्या ठिकाणी भव्य क्रीडा संकूल उभारावे, अशी वाशीकरांची अनेक वर्षापासूनची मागणीही मागणीच राहिलेली आहे.
तालुक्यातील बहुतांश मोडकळीस आलेल्या शाळा अंगणवाड्या पाडून नवीन इमारती कधी बांधल्या जाणार?
वाशी तालुक्यातील युवकांचा बेरोजगारांचा प्रश्न सोडविण्यात कोणतीही प्रगती झालेली नाही. तरुणांच्या आयुष्यात आलेल्या अंधारावर एक दिवस तरी सुर्याची किरणे पडतील या आशेने तरुणपिढी वाट पाहत आहे.
सध्या तालुक्यात मराठवाड्या प्रमाणेच दुष्काळजन्य परिस्थिती आहे. तालुक्यात कसल्याही प्रकारची औद्योगिक वसाहत नाही. गेली कित्येक वर्षांपासून औद्योगिक वसाहत होण्यासाठी नागरिक मागणी करत आहेत; मात्र,अद्याप औद्योगिक वसाहत झाली नसल्याने शहरातील अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण रोजीरोटीसाठी मोठ्या शहरांकडे स्थलांतरित होत आहेत.रोजगार उपलब्ध नसल्याने तालुक्यातील तरुणांचे वाढते स्थलांतराचे प्रमाण चिंताजनक आहे.
तालुक्यातील दळणवळणाचे प्रमुख साधन असणारे एसटी बस स्थानक असून नसल्यासारखे आहे. आजतागायत ह्या बस स्थानकाकडे जाणारा रस्ता बैलगाडी सुद्धा घेऊन जाण्याचा लायकीचा राहिला नसल्याने शहरालगत असलेल्या महामार्गावरून धावणाऱ्या शेकडो एसटी बसेस पैकी एकही बस वाशी बस स्थानकात येत नाहीत.
ही तालुक्यातील जनतेसाठी अतिशय शरमेची बाब आहे.
तसेच लवकरात लवकर एसटी बसच्या देखभालीसाठी वाशी आगाराही कार्यान्वित होण्याची गरज आहे.
वाशी शहरात आयटीआय(औद्योगिक प्रशिक्षण संस्था) युनिट ची इमारत उभी राहुन वाशी तालुका शोभेत आणखीन भर गरजेचे आहे.सद्रक्षणाय खलनिग्रहणाय
ब्रीद घेवून पोलीस कर्मचारी कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी २४ तास सज्ज असतात. कोणत्याही क्षणी रात्री.अपरात्री देखील पोलीस कर्मचाऱ्यांना सेवा बजावी लागते. कोरोना संकट काळातही पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट काम केले. या अधिकारी, कर्मचाऱ्यांना वाशी पोलीस स्टेशन मधील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी काम करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना मात्र अत्यंत जीर्ण झालेल्या व मोडकळीस आलेल्या वसाहतीमुळे किरायाच्या घरात राहून आपले कर्तव्य बजावत आहेत.वाशी पोलीस स्टेशन अंतर्गत ७० गावांचा समावेश आहे.
राहण्यासाठी स्वतंत्र शासकीय व्यवस्था नसतानाही दिवस रात्र आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी ही लवकरात लवकर शासकीय वसाहत होणे गरजेचे आहे.
नगरपंचायत चा बेबी कालावधी संपूनही वाशी नगरपंचायत हद्दीतील सर्वसामान्य जनता अग्निशामक दलाच्या प्रतीक्षेत आहे.
तालुक्याच्या ठिकाणी दुष्काळावर बैठक, आढावा बैठक किंवा एखादी तातडीची बैठक घ्यायचं म्हटलं तर विश्राम ग्रहाची सोय नाही त्यासाठी विश्राम ग्रहाची सोय तातडीने मार्गी लागण गरजेचे आहे.
वाढती वाहनांची संख्या,त्याचबरोबर तालुक्यातून गेलेला राष्ट्रीय महामार्गावर वारंवार अपघात होतात
त्यासाठी वाशी येथील ट्रॉमा सेंटरच्या कामाचा वेग वाढणे महत्त्वाचे आहे.
तालुक्यात छोटे-मोठे तलाव सोडले तर शेती सिंचनासाठी शाश्वत पाण्याचा कुठलाही सोर्स नाही.
आणि तालुक्यातील प्रमुख व्यवसाय शेतीच आहे.
त्यामुळे शेती सिंचन सोबतच शेती पूरक व्यवसाय ऊर्जेसाठी कृषी क्षेत्रात वृद्धी आणणे गरजेचे आहे.
नवीन वर्षात यापैकी कुठल्या कामाचा शुभारंभ लोकप्रतिनिधी कडून केला जाणार की,तालुक्याच्या विकासाची दातखीळ अशीच बसून राहणार.