धाराशिव – धाराशिव जिल्हा ड्रग्स प्रकरणामुळे ढवळून निघाला आहे. तुळजापूर येथील ड्रग्स प्रकरणामुळे तर राजकीय आरोप- प्रत्यारोप होऊ लागले आहेत. दोन दिवसांपूर्वी झालेल्या डीपीडीसीच्या बैठकीतील पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासमोरच खासदार ओमराजे निंबाळकर व तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यातील कलगीतुरा सर्वांनी पाहिला.
या दरम्यान खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी आपल्या सोशल मीडिया हँडल वरून एक पोस्ट शेअर करत ड्रग्स प्रकरणाचा आपणच छडा लावणार असल्याचा थेट इशारा विरोधकांना दिला आहे
काय आहे ओमराजे यांची फेसबुक पोस्ट?
जेव्हा युद्धात जिंकता येत नाही तेव्हा सुरू होते कटकारस्थान.
सार्वजनिक आयुष्यात असताना मी एकच नियम पाळला कायम जनतेला सहज उपलब्ध असेन आणि शक्य तसे त्यांच्या प्रश्नांना न्याय द्यायचा. हे करताना माझे आणि लोकांचे असे नाते जुळून आले की मला त्यांच्या मनातून कोणीही काढू शकत नाही.
निवडणुकीत विरोधक वारेमाप पैशाचे वाटप करून ही जिंकू शकत नाही हे त्यांनी सारखे अनुभवले. मला लोकांनी दिलेले 3 लाख 30 हजार चे मताधिक्य हेच यांच्या पोटदुखीचे मुख्य कारण आहे.
जेव्हा तुम्ही युद्धात जिंकू शकत नाही तेव्हा कारस्थान करून निदान प्रतिमा तरी मलिन करू असा आसुरी आनंद घेण्याचे काहींचे मनसुबे आहेत.
त्याच नियोजनाचा भाग म्हणून खोट बोल पण रेटून बोल या नीतीने विरोधक मला टार्गेट करत असताना मी काय आहे हे जनता जाणून आहे.
ज्या ड्रग्स बद्दल मी सगळ्यात पहिले संसदेत आवाज उठवला, प्रेस घेऊन सत्य समोर आलेच पाहिजे. त्या प्रकरणात मुद्दाम सातत्याने आरोप करून विरोधक राजकीय पोळी भाजत आहेत.
मी राजकारणात पैसे कमावण्यासाठी असतो तर आत्तापर्यंत गद्दारी करून शेकडो कोटी ची माया सहज जमवली असती. पण मला राजकारणासाठी आणि निवडून येण्यासाठी पैश्याची गरज नाही. आता या सर्व प्रकरणाचा मीच पाठपुरावा करणार आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी करणार.
लोकांना एकच विनंती आहे की तुम्ही जे प्रेम कायम दाखवत आहात ते असेच ठेवा बाकी खोट्या लोकांना हा ओम राजे पुरून उरतो.
