वाशी – वाशी तालुक्यातील तेरखेडा येथे खामकरवाडी व तेरखेडा येथील शिवारात चार चाकी गाडी समोरून बिबट्या निघून गेल्याचे मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आढळून आल्याची घटना घडली आहे. ह्या घटनेची चर्चा तेरखेडा व खामकरवाडी या दोन्ही गावात वाऱ्यासारखी पसरल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून याबाबत वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते, दरम्यान प्राथमिक स्वरूपात पाहणी केली असता कोणत्याही प्रकारचे ठसे आढळून आले नसल्याचे सांगत उद्या सकाळी पुन्हा एकदा खात्री करण्यात येणार असल्याचे वन विभागाचे अधिकारी संकेत टाके यांनी सांगितले.
दरम्यान, बिबट्या आल्याच्या चर्चेमुळे परिसरातील शेतकरी तसेच गावातील रहिवासी यांनी सावध राहून खबरदारी म्हणून रात्री शेतामध्ये एकट्याने न जाता समूहाने जाणे तसेच आपल्या जनावरांची व्यवस्थितपणे काळजी घेत त्यांना उघड्यावर न बांधता बंदिस्त गोठ्यात बांधावे, तसेच शेतामध्ये मोठ्या आवाजाचे फटाके फोडणे अश्या प्रकारची खबरदारी घावी.