धाराशिव – विधानसभा निवडणूक जवळ आली असून इच्छुकांनी त्यासाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. धाराशिव – कळंब साठी आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत उभे राहणार हे निश्चित झाल्याचं दिसतंय. 24 सप्टेंबर रोजी तेरणा सहकारी साखर कारखाना येथे ऊस उत्पादक व सभासद तसेच कार्यकर्ता यांचा स्नेह मेळावा आयोजित केला असून या स्नेह मेळाव्यामध्ये धाराशिव-कळंब तालुक्यातील जवळपास पंधरा ते वीस हजार कार्यकर्ते व सभासद येण्याची शक्यता असून या स्नेह मेळाव्याच्या माध्यमातून पुतणे धनंजय सावंत यांना कळंब धाराशिव मतदार संघातून राजकीय स्थिरस्थावर करण्याचे निश्चित मानले जात आहे. आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये उबाठा गटाचे विद्यमान आमदार कैलास पाटील विरुद्ध शिंदे गटाचे उमेदवार म्हणून धनंजय सावंत यांची लढत होऊ शकते. या स्नेह मेळाव्याच्या माध्यमातून सावंत बंधूंनी निवडणुकीचे रणशिंग फुंकल्याचे दिसून येत आहे.
जस-जश्या विधानसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत तस-तसे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे सुद्धा बदलायला सुरुवात झाली आहे धाराशिव जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघातील इच्छुकांची नावे आता समोर यायला लागली आहेत.
आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी जाहीरपणे धाराशिव जिल्ह्यातील परंडा भूम, उमरगा लोहारा, कळंब धाराशिव या तीन मतदारसंघावर दावा केला असून परंडा-भूम-वाशी या मतदारसंघातून विद्यमान आमदार राज्याचे आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत हे पुन्हा उमेदवार असतील तर गेल्या तीन टर्म पासून उमरगा- लोहारा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे ज्ञानराज चौगुले हे चौथ्यांदा नशीब आजमावणार हे निश्चितच आहे. तर धाराशिव कळंब मतदारसंघातून पुतने जिल्हा परिषद धाराशिवचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

स्नेह मेळाव्याच्या माध्यमातून सावंत आपली राजकीय ताकद दाखवण्याची शक्यता असून त्याचाच घाट हा स्नेह मेळाव्याच्या माध्यमातून घातला जात आहे. पुतणे धनंजय सावंत यांना कळंब मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे निश्चित झाले असल्याचे खाजगीत सांगितलं जातय. आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत प्रत्यक्षात विद्यमान आमदार कैलास पाटील यांच्या विरुद्ध कोण असेल हे दिसून येईल.