वाशी येथे उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन
वाशी – कोरोना महामारीच्या काळात वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक,परिचारिका आणि आशा सेविकांनी आपल्या परिवार व जीवाची परवा न करता रुग्णांसाठी काम केले.कोरोना काळातील आरोग्य यंत्रणेने केलेले कार्य अतुलनीय आहे.असे प्रतिपादन पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी केले.
9 जानेवारी रोजी वाशी येथील 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे भूमिपूजन केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत बोलत होते.यावेळी लातूरच्या आरोग्य उपसंचालक डॉ.अर्चना भोसले,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.इस्माईल मुल्ला,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास,उपविभागीय अधिकारी संजय पाटील, तहसीलदार नरसिंह जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे त्यांना जनतेने देवदूत मानल्याचे गौरवोद्गार काढून प्रा.डॉ. सावंत म्हणाले, कोरोनाच्या महामारीत आरोग्य यंत्रणेने केलेल्या कामामुळे त्यांनी या विभागाचे महत्त्व पटवून दिले.24 कोटी 50 लक्ष रुपये निधी खर्च करून वाशी शहरात आंतरराष्ट्रीय पातळीचे सुसज्ज व सर्व सुविधायुक्त रुग्णालय लवकरच जनतेच्या सेवेत सुरू होणार आहे.या रुग्णालयात सर्व अत्याधुनिक चाचण्या,यंत्रसामग्री व शल्यचिकित्सा इत्यादी सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहे.रुग्णालयाच्या इमारतीची वास्तु अत्यंत सायंटिफिक असणार आहे.61 हजार चौरस फूट क्षेत्रात बांधल्या जाणाऱ्या या रुग्णालयात आल्यावर रुग्णांना खाजगी रुग्णालयात आल्याचा भास होईल. स्वच्छता आणि सर्व प्रकारच्या चाचण्या आणि उपचार एकाच ठिकाणी शासकीय इमारतीत मिळत असल्याचा अभिमान प्रत्येक नागरिकास होणार असेही ते म्हणाले.

वाशी येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या भूमिपूजनानंतर पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत यांनी कळंब तालुक्यातील मोहा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाच्या भूमिपूजन समारंभात उपस्थित ग्रामस्थांना या प्राथमिक आरोग्य केंद्राचे रूपांतरण लवकरच ग्रामीण रुग्णालयात करण्यात येईल असे आश्वस्त केले. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीसाठी साडेसहा कोटी निधी खर्च करून या इमारतीचे लोकार्पण 15 ऑगस्टपर्यंत करू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर,नायब तहसीलदार मुस्तफा खोन्दे व सरपंच सीमा मडके यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्र्यांनी राज्य व केंद्र शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या आरोग्य योजनांबाबत उपस्थित ग्रामस्थांना माहितीही दिली.
कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीगृहाच्या भूमिपूजनप्रसंगी पालकमंत्री प्रा.डॉ. सावंत म्हणाले,कळंब शहराची मोठी बाजारपेठ पाहता तसेच येथील लोकसंख्या आणि रुग्णालयाची जुनी इमारत पाहता या ठिकाणी शंभर खाटाच्या रुग्णालयाच्या मागणीचे प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे निर्देश डॉ.सावंत यांनी उपस्थित आरोग्य अधिकाऱ्यांना दिले. प्रसूतीगृहासाठी 76 लाख 13 हजार रुपये मंजूर असून 3 महिन्यात इमारत पूर्ण करण्याचे निर्देशही यावेळी पालकमंत्र्यांनी संबंधित बांधकाम कंत्राटदारांना दिले.
यावेळी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.