हिंमत असेल तर रेल्वे मार्गासाठी राज्याचा ५०% हिस्सा देण्याचा ठाकरे सरकारचा प्रस्ताव जनतेला दाखवा
धाराशिव – तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गासाठी ठाकरे सरकार राज्याच्या वाट्याचा पन्नास टक्के हिस्सा द्यायला तयार होते तर त्याचा प्रस्ताव कुठे आहे? हवेतल्या गप्पा मारून स्वतः अर्धवटराव असल्याचे पुरावेच आज खासदार महोदयांनी सादर केले आहेत. ठाकरे सरकारने या रेल्वेमार्गासाठी प्रयत्न केले होते तर त्याचे पुरावे जिल्ह्यातील नागरिकांना दाखवा.
मुळात खासदार चांगले अभिनेते आहेत. त्यामुळे खोट्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने रंगवून सांगतात. ठाकरे सरकारने प्रस्ताव पूर्ण केला होता असे आज त्यांनी ठोकून दिले. मग तो प्रस्ताव आता कुठे आहे? हेही खासदार साहेबांनी जिल्ह्यातील जनतेला स्पष्टपणे सांगावे. आता लवाद नेमायला लावतो अशी थापही त्यांनी मारली. लवाद हा प्रक्रियेचा भाग आहे. पण हे अर्धवटरावांना कोण सांगणार. भूसंपादन लवाद कोणाच्या सांगण्यावरून नाही तर कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून नेमला जात असतो. तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र रेल्वेच्या नकाशावर येत आहे. ही जिल्ह्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. त्याचवेळी या रेल्वेमार्गासाठी ज्यांची जमीन संपादित करण्यात येत आहे त्यांना समाधानकारक मोबदला मिळावा यासाठी भाजप व आमदार राणाजगजितसिंह पाटील कटिबद्ध आहेत. त्यासाठी रास्त कायदेशीर बाबीचा अवलंब करून सर्व शेतकऱ्यांना न्याय मोबदला मिळवून देण्याची जबाबदारी त्यांनी घेतली आहे.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर व्यक्तिगत पातळीवर जाऊन बिनबुडाचे खोटेनाटे आरोप खासदारांनी केले आहेत. हिंमत असेल तर आपण केलेल्या आरोपांचे पुरावे दाखवा. व्यक्तिगत स्वरूपाचे आरोप करून खासदार साहेब आपण खूप मोठी चूक केली आहे. त्यामुळे व्यक्तिगत जीवनातील तुमचे चरित्र आणि चारित्र्य आता जनतेसमोर आणण्याची वेळ आली आहे.