वाशी – शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या खंडेश्वर प्रकल्पाच्या दुरुस्ती कामाचे भूमिपूजन आज, दि. १० रोजी पालकमंत्री तानाजीराव सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. पालकमंत्री तानाजीराव सावंत यांनी या प्रकल्पासाठी ९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, ऑगस्ट महिन्यातच या कामाचे वर्क ऑर्डर निघाले आहे. पावसाळा संपल्यानंतर तातडीने हे काम सुरू होणार असून, पुढील पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होईल, असा शब्द पालकमंत्री तानाजीराव सावंत यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला.
“२०२५ मध्ये या प्रकल्पाचे लोकार्पण मी स्वतः करणार,” असा विश्वास पालकमंत्री तानाजीराव सावंत यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विकास पाहूनच मतदान करण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले. “पुढील पाच वर्षांत मतदारसंघात एकही विकासकाम शिल्लक ठेवणार नाही,” अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता अण्णा साळुंखे, उपजिल्हाप्रमुख दत्ता बापू मोहिते, जयदेव गोफणे, अॅड. सुभाष मोरे आणि परिसरातील शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.