लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. या निवडणुकीत विकासाचे मुद्द्यांपेक्षा आरोप प्रत्यारोपाचे जास्त भांडवल वापरण्यात आले लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातून आजी-माजी आमदारांनी आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असल्याचं दिसून आलं आहे. लोकसभा निवडणूक मोठ्या चुरशीत पार पडली असून या निवडणुकीत साम-दाम दंड-भेद याचा वापर करण्यात आला असल्याची चर्चा पारावर, टपरीवर, कट्ट्यांवर होत आहे.लोकसभा निवडणुकीत गाव पुढाऱ्यांना चांगलाच भाव आला होता. गावागावातून लीड घेण्यासाठी घबाड पुरविण्यात आलं होतं, मात्र आणि गाव पुढाऱ्यांनी वरून आलेले घबाड दडपल्याची कुजबूज सुरू आहे. मतदानानंतर मतांची आकडे मोड करून आपलं गाव कसं प्लस राहील याचा अंदाज बांधला जात आहे. मात्र नेत्यांनी दिलेली जबाबदारी गाव पुढाऱ्यांनी पार पाडली की नाही हे निकालाअंती स्पष्ट होणार आहे. मतदानाबाबत मतदारांच्या हालचाली पाहता आपल्या गावातून लीड मिळेल का नाही? याची काळजी असून घबाड घेतलेल्या अनेक गाव पुढाऱ्यांची झोप उडाली आहे.