वाशी – वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील सुतार गल्लीतील जाज्वल्य दैवत श्री.दत्त मंदिरात दत्त जयंती निमित्त दि.७ डिसेंबर ते १४ डिसेंबर नाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून श्री.विलास महाराज यांचे मार्गदर्शना नुसार श्री.उमेश महाराज यांचे नेतृत्वात किर्तन, हरिपाठ, हरिजागर, संगीत भजन व अन्नदान आदि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये ह.भ.प.उमेश महाराज यांच्या काल्याचे किर्तनाने व महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होईल.
दि.९ डिसेंबर रोजी भूम येथे वास्तव्यास असलेले स्टेट बँक अधिकाऱी अंबादास देशपांडे (संगीत विशारद) यांचा अभंगवाणी हा सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाची सुरुवात यमन रागात पारंपरिक भजन ” जयजयराकृष्ण हरि” ने केली त्या नंतर विविध संतांचे अभंग यामध्ये ” अमृताहुनी गोड नाम तुझे देवा” ” वेढा वेढा रे पंढरी ” “अमृताची फळे अमृताचे वेली “, ” ज्ञानराज माझी योग्याची साऊली”, ” पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी “, ” निघालो घेऊन दत्ताची पालखी “. ” निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे “इ. अभंग अतिशय ढंगदारपणे गाऊन वातावरण भक्तिमय केले.शेवटी संत तुकाराम महाराजांच्या ” शेवटची विनवणी ” ह्या भैरवीने कार्यक्रमाची सांगता केली.
अधिक अपडेट्ससाठी आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करा
कार्यक्रमास तबला साथ उल्हास जवाहिरे, बाळासाहेब चव्हाण, पखावज श्रीरंगबापू पौळ तर सहगायन दत्ता गोळे, व टाळ साथ बप्पा जोशी, भगवान पवार यांनी केली. या अनोख्या अभंगवाणीने सप्ताहास उपस्थित असलेले भाविक मंत्रमुग्ध झाले होते. उपस्थितांनी टाळ्यांची दाद देत सादरकर्त्यांचे कौतुक देखील केले.